पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्षभराच्या कालावधी पूर्ण होत असताना राज्यात भाजपाच्या वतीने वर्षपूर्तीचे कार्यक्रम झोकात साजरे होत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र एकही कार्यक्रम झाला नाही. नुकत्याच झालेल्या राज्य भाजपा कार्यकारिणी परिषदेच्या निमित्ताने पंधरवडाभर अविश्रांत झटणारे भाजपा कार्यकत्रे वर्षपूर्ती साजरा करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे मंगळवारी दिसून आले. तर दुसरीकडे मोदी शासनाच्या घोषणाबाज कारभारावर टीकेची झोड उठवत काँग्रेस पक्षाच्या वतीने अच्छे दिनाची पुण्यतिथीचे निषेधात्मक आंदोलन केले.
पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षी २६ मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. मोदी यांनी वर्षभराच्या कालावधीत जनहिताचे तसेच राष्ट्रहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हे निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन येथे झालेल्या राज्य भाजपाच्या कार्यकारिणी परिषदेत अनेक मान्यवर वक्त्यांनी केले हाते. त्याची सुरुवात मोदी शासन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमापासून करावी, असेही सूचित करण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरात भाजपाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा धडाका उडविला तथापि यास कोल्हापूर जिल्हा मात्र अपवाद राहिल्याचे मंगळवारी दिसून आले. भाजपाच्या राज्य परिषदेची सांगता रविवारी झाली. तीन दिवस भाजपाचे केंद्र व राज्यातील मंत्री, पदाधिकारी यांच्यामुळे कोल्हापूर गजबजले होते. तर या परिषदेच्या तयारीसाठी भाजपाचे शेकडो कार्यकत्रे गेले पंधरा दिवस अहोरात्र प्रयत्नशील होते. यामुळेच परिषद यशस्वी पडल्याचा निर्वाळा अनेकांनी दिला होता. मात्र परिषदेसाठी ताकद पूर्ण लावलेले भाजपाचे कायकत्रे चांगलेच दमले होते. ते अजूनही विश्रांतीच्या मूडमध्ये आहेत. परिणामी मोदी सरकारची वर्षपूर्ती होत असताना जिल्ह्यात भाजपाच्या वतीने कोणताही ठळक कार्यक्रम राबविला नसल्याचे आज दिसून आले.
काँग्रेसचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाले असताना काँग्रेसच्या वतीने अच्छे दिन पुण्यतिथीचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवनाजवळ झालेल्या या आंदोलनावेळी एका टेबलावर श्राद्धाचे भोजन दोन ताटामध्ये ठेवण्यात आले होते. उदबत्ती, मेणबत्ती लावून पुण्यतिथी घालण्यात आली. जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यता आली. जिल्हा काँग्रेसे अध्यक्ष पी.एन.पाटील ,सुरेश कुराडे, एस.के. माळी यांच्यासह काँग्रेस कार्यकत्रे आंदोलनात सहभागी झालेले.