“बाबा टीव्ही बंद कर,
बंद कर ना टीव्ही…”
असं म्हणून ते मुल बापाच्या पोटाला बिलगलं…
त्याच्या छातीची ठकाकणारी धडधड त्या बापाच्या छातीला जाणवली आणि आत-आत खिंडार पाडत गेली…
निमित्त होतं टीव्हीवर चाललेल्या एका ज्वलंत (?) विषयावरच्या चर्चेचं…
ज्यात जात, धर्म, पंथ यावर त्वेषपूर्ण चर्चा चालली होती. बरे-वाईट आरोप, श्रेष्ठ कनिष्ठ दाखले दिले जात होते. ते हातवारे, तो आरडा-ओरडा, तो त्वेष पाहून तो सात-आठ वर्षांचा लहानगा घाबरला. ते ऐकून, पाहून तो बाबाला म्हणाला, “बंद कर टीव्ही बाबा” बाबानं टीव्ही पटकन बंद केला, मुलाला विचारलं “काय झाल?”
“मला भीती वाटतीये, आपण XXX जातीचे ना…?
बाबाला ‘हो’ म्हणावं लागलं.
रात्रभर त्या मुलाची छाती भीतीनं धकाकत होती आणि बाबाची छाती काळजीनं धपापत होती…
त्याच्या बाबाला कळेच ना, मुलाला आपण ‘हो’ आपण त्याच जातीचे आहोत हे सांगून चूक केली का? की त्याच्यापासून जात लपवायला पाहिजे होती…?
ज्या वयात त्याला त्याचं बालपण जगू द्यायचं सोडून टीव्हीतल्या चर्चेमुळे आपण जात पेरून त्याचं जगणं विदारक करतोय का…?
अनेक प्रश्नांच्या कल्लोळानं बाप थरारलाच!
अशा भेदरलेल्या मुलाचं काय करायचं
उद्या तो शाळेत जाऊन म्हणू शकतो.
ए… तू कुठल्या जातीचा…? तो कुठल्या जातीचा ते कुठल्या जातीचे…?
जनमानसातला संवाद वाढावा म्हणून ज्या चर्चा (सरसकट नव्हे, फक्त भडक) घडवल्या जातात, पण त्या ऐकून जन्माला येणारी पिढी संवादहिन होत चाललीये का…?
बालभारती, कुमारभारती, युवकभारती होतील, पण आपापल्या रंगाचे झेंडे असलेले…
पिढी जन्मेल पण जातवार विभागलेली, तंत्रज्ञानानं पुढारलेली पण जातीमुळे दुभंगलेली…
रात्रभर तो मुलगा त्याच्या बाबाच्या छातीच्या जितक्याजवळ जाऊन झोपता येईल तितका जवळ जाऊन झोपला होता. त्याचा बाबा (बाप) मात्र अखंडरात्र जागा होता. याला कसं समजाऊ की असं घाबरू नकोस, ते असंच बोलतात, त्यांच्या मनात काही नसते, ती फक्त चर्चा असते, एकमेकांच्या जातीवर, धर्मावर, पक्षावर त्यांना नाईलाजानं बोलावं लागतं, खोटं असतं सगळं, चर्चा करणारे, भांडणारे हे सगळे एकमेकांचे चांगले मित्र असतात…
खूप जुळवाजुळव केली बापानं पण एकाही तर्काशी स्वतःला बांधता येईना…
मात्र त्याला कसंही करून त्याच्या मुलाला आश्वस्त करायचंच होतं की, काहीही होत नाही, कुणीही आपल्याला काहीही करणार नाही, घाबरू नकोस, याची त्याला खात्री करून द्यायची होती तेही तो सकाळी शाळेत जायच्या आत…
कारण त्यानं शाळेत जाऊन जात-वार मित्र गोळा केले तर? बाप घाबरला…
खात्रीपूर्वक जागा राहिला. झोप लागली तर तो शाळेत निघून जाईल…
शाळेत जायच्या आत त्याला माणूसकीचा धडा शिकवायचा होता…
सगळे लोक चांगले असतात, सगळे धर्म, जाती त्यातली माणसं चांगली असतात. खूप चांगली असतात. हे त्याला मनोमन सांगायचं होतं…
तो बाप जागा होता…
पण एखाद्या बापाला झोप लागली तर? तो गाफील राहिला तर? त्यानं मुलाला समजाऊन सांगून त्याची दडपलेली छाती मोकळी नाही केली तर…? त्याचं त्या दिवशी दुर्लक्ष झालं तर…? माझ्या मित्राला वंदन आहे.
तो रात्रभर जागा राहिला. सकाळी त्यानं मुलाला माणूसपणाचा धडा दिला. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावरही पुन्हा सांगितलं. त्याला पटल्याची खात्री केली…
बापानं मोकळा श्वास घेतला…
ता.क.
मन सुद्ध तुझं गोस्ट हाये
पृथ्वी मोलाची…
तु जा र पुढं, तुला रं गड्या
भीती कुणाची पर्वाही कुणाची
– मिलिंद शिंदे