25 March 2019

News Flash

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार- हजारे

२३ मार्चपासून हजारे हे दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत.

अण्णा हजारे ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उत्पन्नावर आधारित हमीभाव मिळत नसल्याने देशातील शेतकऱ्यांच्याआत्महत्यांना केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

येत्या २३ मार्चपासून हजारे हे दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. स्थानिक पातळीवरील आंदोलनाचे नियोजन प्रचार व प्रसारासंदर्भात राज्यातील कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर मंगळवारी राळेगणसिद्धीतील पद्मावती मंदिराच्या प्रांगणात पार पडले. या वेळी हजारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हजारे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. या कायद्याला कमजोर करण्यासाठी कलम ६३ व कलम ४४ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. ज्या वेळी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते, अडचणीत सापडलेल्या बँकांना मदत करते, मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात या सरकारला अडचण नसावी. उत्पादनावर आधारित हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यावर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही व आत्महत्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  शेतमालाच्या उत्पादनास किती खर्च येतो याचा अहवाल केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडे पाठवण्यात येतो.  या आयोगात असलेल्या झारीतील शुक्राचार्याकडून अहवालात आलेल्या भावांमध्ये ३० ते ५० टक्के कपात केली जाते.  एक ते पाच टक्के तफावत ठीक, मात्र इतका मोठा फरक पडू शकत नाही असा दावा हजारे यांनी केला.

या वेळी जनआंदोलनाचे उपाध्यक्ष बालाजी कोमपलवार, सचिव अशोक सब्बन, विश्वस्त श्याम आसावा, अल्लाउद्दिन शेख, डॉ. शिवनाथ कुंभारे, सरपंच रोहिणी गाजरे, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, संजय पठाडे, राजाराम गाजरे, श्याम पठाडे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, कल्पना इनामदार यांच्यासह सुमारे ४०० कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

दुसरा केजरीवाल उदयास येणार नाही!

दिल्लीतील मागील आंदोलनात सहभागी झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. या वेळी मात्र प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र करून घेण्यात येणार असल्याने त्यांना पुढे राजकारणात उतरता येणार नाही व दुसरा केजरीवाल उदयासही येणार नाही, असेही हजारे यांनी या वेळी सांगितले.

First Published on March 14, 2018 3:51 am

Web Title: center government responsible for farmers suicides says anna hazare