केंद्र सरकारने पंतप्रधान निधीतून (पीएम केअर्स) खरेदी करून राज्यात पाठवलेले व्हेंटिलेटर सदोष आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला असून  या संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्र सरकारला विचारणा करावी असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

ते सोमवारी नगरमध्ये बोलत होते. समवेत आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. राज्यातील मंत्र्यांच्या वाहने खरेदीवरून फडणवीस यांनी टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना आ. पवार यांनी हा टोला लगावला. मंत्र्यांच्या गाडी खरेदीचा विषय जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचा आहे, परंतु हा काही देश किंवा राज्यापुढील  मुद्दा नाही. भाजपच्या आमदारांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला पैसा (पीएम केअर्स) दिला. त्यातून केंद्र सरकारने खरेदी केलेले व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवले आहेत. परंतु ते खराब आहेत.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारला विचारणा करावी, असाही टोला आ. पवार यांनी लगावला.

पारनेरच्या प्रवेशापूर्वी चर्चा

शिवसेनेच्या पारनेरमधील पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्यासंदर्भात रोहित म्हणाले की, शिवसेनेचे नगरसेवक इतर पक्षाकडे जाणार होते, त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण झाली असती, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच  प्रवेशाचा हा निर्णय घेण्यात आला.