06 August 2020

News Flash

विठ्ठल-रक्मिणी मंदिराच्या जतनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या सूचना

मंदिराच्या या ऐतिहासिक रचनेला गेल्या काही वर्षांत धोका निर्माण झाला आहे.

विठ्ठल-रक्मिणी मंदिर

मंदिर पाहणीनंतर अहवाल पाठवला

* रंगरंगोटी स्वच्छ करावी * आधुनिक बांधकामे, बदल नकोत * योग्य दर्शन मार्ग हवेत * सुविधा देताना ऐतिहासिक रचनेला धक्का नको

मंदार लोहोकरे, पंढरपूर

श्री विठ्ठल-रक्मिणीच्या मुख्य मंदिरासह परिसरातील ऐतिहासिक मंदिरात केलेली बेडभ रंगरंगोटी, नव्याने केलेली बांधकामे-दुरुस्त्या, चुकीचे दर्शन मार्ग, विद्युत वाहिन्यांचे जाळे या साऱ्यांवर बोट ठेवत भारतीय पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे मूळ प्राचीन वैभव जतन करण्यासाठी या गोष्टी वेळीच दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिरे यांच्या जतनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवून या मंदिरांची पाहणी करत सूचना करण्याची विनंती केली होती. यानुसार या विभागाच्या तज्ज्ञ समितीने ऑगस्ट महिन्यात नुकतीच या मंदिरांची पाहणी केली. या वेळी त्यांना आढळून आलेल्या त्रुटी आणि समस्यांबाबत त्यांनी एक अहवाल मंदिर समितीला पाठवला आहे. यामध्ये वरील सूचना करण्यात आल्या आहेत.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मूळ मंदिर हे १२ व्या शतकात बांधले गेले आहे. त्यामध्ये पुढे सतराव्या शतकातही काही बदल केले आहेत. मंदिराच्या या ऐतिहासिक रचनेला गेल्या काही वर्षांत धोका निर्माण झाला आहे. मंदिरातील दुरुस्त्या, सोयीनुसार केलेले बदल, नवी बांधकामे, रंगरंगोटी, विद्युत – दूरध्वनी वाहिन्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रचना, पखे, दर्शनमार्गिका या साऱ्यामुळे या ऐतिहासिक रचनेला अनेक ठिकाणी तडा गेला आहे. त्याचा प्राचीन चेहरा विद्रुप झाला आहे, तर काही ठिकाणी या वारशाला धोका निर्माण झाला आहे. याची दखल या अहवालात घेत त्यावर उपाययोजनाही सांगितल्या आहेत.

मुख्य विठ्ठलाच्या मंदिरात बाजीराव पडसाळी येथे ऐतिहासिक रचनेवर ‘सिमेंट काँक्रिट’चे छत तयार करण्यात आले आहे. ते हटवण्यास सूचवले आहे. याशिवाय विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराचा ऐतिहासिक चेहरा विद्रुप करणारी रंगरंगोटी, सभागृहातून फिरवलेले लोखंडी दर्शनमार्ग, विद्युत-दूरध्वनी वाहिन्यांचे जाळे हे सर्व हटवण्यास सुचवले आहे.

विद्युत वाहिन्यांचे हे जाळे प्राचीन मंदिराची शोभा तर घालवत आहेच पण यातून या गर्दीच्या स्थळी अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. सर्वच मंदिरात बसवलेली शहाबादी वा मार्बलच्या फरशा काढून त्याजागी दगडी फरसबंदी बसवण्यास सुचवले आहे. ही आधुनिक फरशी ऐतिहासिक वास्तूशी सुसंगत तर दिसेलच पण त्या ओल्या असताना त्यावरून घसरून पडण्याचा धोका देखील टाळता येईल. गर्भगृहात मढवलेले चांदीचे पत्रे तुटून त्याची टोकेही वर आलेली आहेत. त्यापासूनही इजा होऊ शकते. या मंदिरात मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बसवण्याची सुचनाही या अहवालात करण्यात आली आहे. मंदिरातील तापमान योग्य राखल्यास त्याने या ऐतिहासिक वास्तूचे आयुष्य वाढवण्यास मदत होईल असे या अहवालात म्हटले आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील कालभैरव, खंडोबा, एकवीरा, सोमेश्वर, विष्णुपद, श्री रिद्धी सिद्धी, यमाई-तुकाई, पद्मावती, तुळजा भवानी, रामबाग मारुती, व्यास नारायण, लखुबाई, काला मारुती आदी मंदिरांबाबतही या अहवालात सूचना करण्यात आल्या आहेत. या बहुतेक ठिकाणी मंदिरात केलेली रंगरंगोटी स्वच्छ करणे, आधुनिक फरसबंदी बदलणे, शिखरांवर उगवलेली झाडे काढून टाकणे आदी स्वरुपाच्या सूचना केल्या आहेत.

ऐतिहासिक वारसा जतन करणार

ऐतिहासिक विठ्ठल-रक्मिणी मंदिराच्या जतनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे पाहणी करण्याची विचारणा केली होती. यानुसार या विभागाने या मंदिराच्या जतनासाठी आवश्यक सूचना आणि उपाययोजनांचा अहवाल दिला आहे. त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करत मंदिराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

डॉ. अतुल भोसले, अध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 1:41 am

Web Title: central archeology department notice to save vitthal rakmini temple
Next Stories
1 दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंचा आवाज अयोध्येत घुमणार
2 मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती, ३००० गावांची हंगामी पैसेवारी ५०च्या आत
3 बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप चुकीचा – मुख्यमंत्री
Just Now!
X