मध्य चांदा वन विभागात यंदा एकही बळी नाही

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : घनदाट जंगल, २५० पेक्षा अधिक पट्टेदार वाघांचे वास्तव्य आणि जंगलात वनउपजाच्या शोधात गावकऱ्यांचा सदैव वावर, यामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ात मानव-वन्यजीव संघर्ष नित्याचाच. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत २२ ग्रामस्थांनी जीव गमावला. हा संघर्ष अधिक तीव्र होत असताना आणि ग्रामस्थ विषप्रयोग करून व जिवंत वीज प्रवाह सोडून वाघाची शिकार करीत असताना मध्य चांदा वन विभागात यंदाच्या मोहफूल-तेंदूपत्ता हंगामात वाघाच्या हल्ल्यात एकाही ग्रामस्थाचा बळी गेला नाही किंवा वन्यजीवांच्या शिकारीची घटनाही घडली नाही. इतकेच नाही तर वन वणवा, जंगलातील आगी, जंगलतोड, उघडय़ा विहिरीत पडून वन्यजीवांचे मृत्यू, वन विभाग-गावकरी संघर्ष अशा एकाही घटनेची नोंद देखील नाही. हा सकारात्मक बदल घडवून आणला आहे मध्य चांदा वन विभागाचे उपवसंरक्षक अरविंद मुंढे या तरुण वनाधिकाऱ्याने. त्याला तेवढीच समर्पक साथ मिळाली आहे या विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल, वनमजूर अशा १६० वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्य़ातील ५० टक्के भूभाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, ब्रह्मपुरी वन विभाग, चंद्रपूर वन विभाग, मध्य चांदा वन विभाग, वन विकास महामंडळाचे जंगल येथे आहे. या जंगलात सध्या २५० पेक्षा अधिक वाघांचे वास्तव्य आहे. वाघांची वाढती संख्या आणि माणसाचा जंगलातील वावर वाढला तेव्हापासून या जिल्ह्य़ात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे.  मध्य चांदा वन विभागाचे जंगल १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रात आहे. त्यात जवळपास ३०० गावांचा समावेश आहे. बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, राजुरा, कोरपना मुख्य तालुक्यांपासून तर तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यापर्यंत या विभागाचा विस्तार आहे. या एका विभागातील जंगलात २२ पट्टेदार वाघ, बिबटय़ा, अस्वल व इतर वन्यजीव आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात मोहफूल व तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला की या जिल्ह्य़ात ३० ते ३५ लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होतो. जंगलालगतच्या गावातील ग्रामस्थ दररोज सकाळी गौण वनउपज आणण्यासाठी जंगलात जातात आणि वन्यप्राण्यांचे बळी ठरतात. याशिवाय  ग्रामस्थ विषप्रयोग किंवा जिवंत विद्युत प्रवाह सोडून वाघांच्या शिकारी करतात. या संघर्षांत मानव आणि वन्यजीव दोन्ही बळी पडत आहेत. त्यामुळे हा संघर्ष थांबावा या दृष्टीने वन खात्याकडून प्रयत्न होण्याची गरज होती. मात्र ही बाब आजवर येथे कार्यरत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही.

बदल

केवळ ग्रामस्थांनी जंगलात जाऊ नये हा एकच पाढा अधिकारी वाचत राहिले. वर्षभरापूर्वी मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक पदाचे सूत्र स्वीकारणारे अरविंद मुंढे यांनी वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा बळी जाणार नाही, जंगलाला आगी, वन वणवा लागणार नाही याच सकारात्मक विचारातून कामाला सुरुवात केली. यावर्षी उन्हाळय़ात मार्च ते जून या तीन महिन्यांच्या मोहफूल तेंदूपत्ता हंगामात एकाही ग्रामस्थाचा बळी वाघ किंवा इतर वन्यजीवाच्या हल्ल्यात गेला नाही.

गावकऱ्यांमध्ये जनजागृती

जंगलात आग, वन वणवे, जंगलतोड, शिकार या घटना देखील घडल्या नाही. वन कर्मचारी व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन एकेक उपक्रम राबवण्यास मुंढे यांनी सुरुवात केली. आजवर मोहफूल व तेंदूपत्ता हंगामात गावकरी पहाटे ४ वाजताच जंगलात जात होते. जास्तीत जास्त मोहफूल वेचण्यासाठी गावकरी समूहाने न जाता एकटेच निघून जायचे. मात्र आता गावकऱ्यांना जंगलात जायचे असेल तर समूहानेच जावे लागेल आणि सोबत वन पथक राहील हे बंधनकारक करण्यात आले. आता दररोज वन कर्मचारी गावकऱ्यांच्या समूहाला सकाळी जंगलात घेऊन जातात.

जंगलात जाण्याच्या वेळेत बदल केला आहे. पहाटे सहा वाजेपर्यंत वाघ व इतर वन्यप्राणी जंगलात फिरत असतात, त्यामुळे  सकाळी सहा वाजताची वेळ टाळून सातच्या सुमारास सर्वानी समूहाने जायचे आणि मोहफूल, तेंदूपत्ता तोडेतपर्यंत समूहासोबत तिथेच राहायचे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या भागातील गावकऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मोहफूल, तेंदूपत्ता आहे. त्यामुळे या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील हा व्यवसाय करणाऱ्या गावकऱ्यांची यादी तयार केली. जंगलात वाघाच्या शिकारीसोबतच हरीण, चितळ, रानडुक्कर यांच्या शिकारीचे प्रमाण अधिक आहे. हरीण व रानडुकराचे मांस विकताना अनेकांना अटक केली. यावर आळा घालण्यासाठी मोहीम राबवली.

१२० खुल्या विहिरींवर बांबूचे कुंपण

मध्य चांदा वन विभागातील जंगलात मोहीत राबवताना १२० खुल्या विहिरी असल्याचे कळले. अशा खुल्या विहिरीत पडून वाघ, बिबट किंवा एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या सर्व विहिरींना तात्पुरत्या स्वरूपात बांबूच्या ताटव्यांचे कुंपण केले.

वन विभागाच्या या उपक्रमामुळे वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू, वन्यजीवांचे माणसांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जंगलतोड, शिकार, वृक्षतोड, जंगलांना आग लावणे, वन वणवा या सर्व गोष्टींना आळा बसला आहे. दवंडी देणे, प्रचार, प्रसिद्धीमुळे लोकांमध्ये जनजागृती झाली आहे.

– दिवाकर तोडासे, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सातारा भोसले.

यावर्षी जंगलात वाघाच्या हल्ल्यात एकाही गावकऱ्याचा बळी गेला नाही. मार्च, एप्रिल, मे हा उन्हाळय़ाचा कालावधी मोहफूल, तेंदूपत्ता हंगामाचा आहे. याच काळात जंगलात मोठय़ा घटना घडतात. गावकरी जंगलात जातात आणि व्याघ्र हल्ल्यात बळी पडतात. परंतु यावर्षी विशेष मोहीम राबवल्यामुळे गावकऱ्याचे प्राण वाचवू शकलो याचा आनंद आहे. यावर्षी इतर विभागांत घटना घडल्या असल्या तरी मध्य चांदा वन विभागात वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याच्या बळीची एकही घटना नाही.

– अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वन विभाग