अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची आपल्या गावातही पाहणी करावी म्हणून रस्त्यात वाहने रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत तसेच या संकटामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेटण्याचे टाळून बहुचर्चित केंद्रीय पथकाने गुरूवारी धुळे जिल्ह्यात केलेला दौरा निव्वळ सोपस्कार पार पाडण्यासारखा ठरला. पथकाने बोटावर मोजता येईल इतक्याच ठिकाणी धावती भेट दिली आणि अवघ्या काही मिनिटांत तुरळक शेतकऱ्यांची व्यथा जाणून पुढे मार्गस्थ होणे पसंत केले.
अवकाळी पाऊस व गारपिटीने उत्तर महाराष्ट्रात एक लाख दहा हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तयाची पाहणी करण्यासाठी आर. एल. माथूर, एस. एम. कोल्हटकर व संजीव चोप्रा या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले केंद्रीय पथक नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्णााच्या दौऱ्यावर आले आहे. पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्णातील नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार होते. परंतु, कार्यक्रमात बदल करून पथकांच्या वाहनांचा लांबलचक ताफा सरळ धुळ्यात गेला. तेथील बिलाडी व जपी गावातील प्रत्येकी एका शेताचे पथकाने अवलोकन केले. यावेळी संबंधित शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटांत आपल्या व्यथा मांडणे भाग पडले. यावेळी जमलेल्या इतर शेतकऱ्यांशी पथकाने बोलणेही टाळले. कापडणे गावातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची पथकाने भेट घ्यावी असा स्थानिक आमदारांचा प्रयत्न होता. परंतु, पथकाने त्या गावाला जाण्याचे टाळून साक्रीचा रस्ता धरला. यावेळी काही भागात पावसाला सुरूवात झाली होती. आपल्या गावातील स्थिती पहावी म्हणून भदाणे गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर जमून पथकाची वाहने रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करीत पथकाला रस्ता मोकळा करून दिला. या दौऱ्यात सहभागी होऊ न दिल्याच्या कारणावरून आ. प्रा. शरद पाटील आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची शाब्दीक बाचाबाची झाली. प्रशासकीय यंत्रणा आचारसंहितेचा बाऊ करत असल्याची तक्रार आ. पाटील यांनी केली. साक्री तालुक्यातील धावता दौरा आटोपून पथक रात्री नाशिककडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

पुन्हा मुसळधार पाऊस व गारपीट
उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाचे स्वागतच पावसाने केले. धुळ्यात पाहणी दौरा सुरू असताना पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्णाातही सायंकाळी काही भागात पुन्हा गारपीट तर काही भागात मुसळधार पावसाने झोडपले. नाशिक शहर व परिसरासह मोसम पट्टा, मालेगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला तर नामपूर, अंबासन, ताहराबाद भागात पुन्हा गारपीट झाली. या भागातील डाळिंब बागा व शेती पावसाने आधीच उध्वस्त झाली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा त्यात भर पडली. नैसर्गिक संकटात कशीबशी तगलेली पिकेही या पावसाने भुईसपाट झाली.