सांगली : बिहारमध्ये पूर आला तर तातडीने मदत देणारे केंद्र शासन महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजला तरी मदतीबाबत बोलण्यास तयार नाही. केंद्र शासन महाराष्ट्राबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई करावी लागेल असेही ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, की राज्यातील १८ ते २० जिल्ह्य़ांत अतिवृष्टीने शेतीचे सुमारे ५० हजार कोटींचे नुकसान झाले असून काढणीला आलेले पीक वाहून गेले आहे. खरीप पिकांबरोबरच द्राक्ष, डािळब, ऊस, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. केंद्राने ७५ तर राज्य शासनाने २५ टक्के आपत्ती निवारण निधीतून तत्काळ शेतकऱ्यांना द्यायला हवेत अशी स्वाभिमानीची मागणी आहे. राज्यातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने तत्काळ केंद्रीय पथक पाठवावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्बारे केली आहे.

शेट्टी म्हणाले, की आज जागतिक तापमान वाढीचा फटका जगातील शेतीला बसत आहे, केवळ २-३ देशाच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला वैश्विक तापमान वाढीचा परिणाम सोसावा लागत आहे, त्यामुळे जगभर फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तसेच जागतिक आपत्ती निवारण कोष स्थापन करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर आल्यावर त्याठिकाणी केंद्र सरकारने तातडीने मदत केली, मात्र महाराष्ट्रात एवढे मोठे नुकसान झाले आहे, पण अद्याप मदतीची भूमिका का घेतली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी केवळ दौरे काढून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत, तर प्रत्यक्ष हातात काही तरी पडायला हवे असा टोला लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पदग्रहण करण्यापूर्वी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती, आता त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी सांगितले.