कोकणातील आंबा बागायतदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंबा पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या कृषी संशोधन विभागाने पुढाकार घेतला आहे. कोकणातील आंबा पिकाचे कीड व रोग सर्वेक्षण करून त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  देशांतर्गत वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी शासनस्तरावर कृषी संशोधन विभागामार्फत क्रॉप स्व्ॉप ही योजना राबविली जाते आहे. या योजनेत समाविष्ट झालेल्या पिकांच्या वेगवेगळ्या स्तरांवरचे सर्वेक्षण करून त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. या वर्षी या योजनेसाठी कोकणातील आंबा पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. यानुसार आंबा पिकावरील कीड व रोगांचे दर आठवडय़ाला सर्वेक्षण केले जाणार आहे.
सर्वेक्षणानंतर सर्व माहिती एकत्रित करून ऑन लाइन पद्धतीने केंद्र सरकारच्या कृषी संशोधन केंद्राला कळवली जाणार आहे. त्यावर दापोली कृषी विद्यापीठ तसेच कृषी संशोधन केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शन तथा सूचना करणार आहे. तज्ज्ञांकडून आलेल्या या सूचना तथा मार्गदर्शन एसएमएस तथा झेरॉक्सच्या प्रतीच्या माध्यमातून गावपातळीवर पोहोचवल्या जाणार आहेत. त्यामुळे थेट गावपातळीवरील शेतकऱ्यांना या हंगामात तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी होणार आहे.
या कीड सर्वेक्षण आणि रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय कीड आणि रोगाची लागण झालीच, तर ती तातडीने नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही योजना आंबा बागायतदारांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.
सध्या क्रॉप स्व्ॉप योजनेंतर्गत पिकाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून जिल्ह्य़ात पीक परिस्थिती चांगल्या परिस्थितीत आहे. कृषी संशोधन विभागाकडून येणाऱ्या सूचना बागायतदारांना वेळोवेळी दिल्या जात असल्याचे रायगडचे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.