सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्य़ातील काही भागांना भेटी दिल्या. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील निवडक भागांची या पथकाने पाहणी केली. परंतु केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा पावसाळ्याच्या तोंडावर झाल्यामुळे हा ‘वरातीमागून घोडे’ पाठविण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. तर हा पाहणी दौरा केवळ औपचारिकतेचा भाग असल्याचा सूरही लावण्यात आला.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे पाच जणांच्या केंद्रीय पथकाने दुष्काळी भागाची पाहणी केली. तेथील पाणीपुरवठय़ाचा स्रोत, पाण्याअभावी जळालेल्या द्राक्षांसह आंबा, पेरूंच्या बागा या पथकाच्या नजरेत आल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरडा पडलेल्या धुबधुबी धरणाची अवस्थाही या पथकाने पाहिली. तळ गाठलेल्या विहिरींचे वास्तववादी चित्र या पथकाने पाहिले. या केंद्रीय पथकात राणी कुमुदिनी, आर. के. सिंग, पी. के. मिश्रा, जी. आर. झरगर आदींचा समावेश होता. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रणजितकुमार व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांत श्रीमंत पाटोळे हे देखील होते.
जेऊर गावच्या ओसाड शिवारातील दुष्काळाची दाहकता व भयावह स्थिती गावक ऱ्यांनी या पथकासमोर मांडली. या दुष्काळी परिस्थितीत गावकरी करीत असलेली शेतातील कामेही या पथकाने पाहिली व त्यातील वास्तवता समजवून घेतली. माजी आमदार महादेव पाटील हे याच जेऊर गावचे. त्यांनी केंद्रीय पथकासमोर दुष्काळी स्थितीचे चित्र उभे केले व प्रत्यक्ष परिस्थितीही दाखविली. या वेळी दुष्काळग्रस्त भागाला मदतीची आत्यंतिक गरज असल्याची आग्रही भूमिका पाटील यांनी मांडली. अक्कलकोट तालुका भाजपचे अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांच्यासह शामसुंदर मसुती, आनंद खजूरगीकर यांनीही दुष्काळग्रस्त भागाला मदत मिळावी म्हणून केंद्रीय पथकाला निवेदन सादर केले. जेऊरनंतर शिरवळ येथेही या केंद्रीय पथकाने भेट देऊन तेथील दुष्काळी परिस्थिती नजरेखाली घातली. काशीनाथ चंद्रकांत पाटील यांची जळालेली द्राक्ष बाग व इतर बागांसह दोनशे दुभत्या जनावरांपैकी तब्बल १९६ जनावरे केवळ चाऱ्याअभावी विकण्यात आल्याची माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली. केंद्रीय पथकाने मुळात दुष्काळी भागाचा पाहणी दौरा शेवटच्या टप्प्यात केला असताना त्याविषयी स्थानिक गावक ऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी या पथकाने केलेला हा अक्षरश: धावता दौरा होता. या पथकाच्या म्हणण्याप्रमाणे सर्वत्र अशीच स्थिती आहे. त्यामुळे पथकाने शितावरून भाताची परीक्षा घेतली. दुष्काळग्रस्तांचे चेहरे वाचल्यानंतर स्थानिक दुष्काळाची तीव्रता लक्षात आल्याचे पथकातील राणी कुमुदिनी यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्याचा एकत्रित अहवाल केंद्रात सादर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पथकातील आर. के. सिंग यांनी अक्कलकोट तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कंपार्टमेंट बंडिंग व अन्य कामांचे महत्त्व वाढण्याची गरज प्रतिपादन केली. दुष्काळग्रस्त भागाला तातडीने मदतीची गरज असल्याची कल्पना आल्याचे त्यांनी विशद केले.