मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक तोंडावर आलेली असताना हे प्रकार केले जात आहेत, पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा आरोप केला. मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली जाते आहे असाही आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडूनही सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातल्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी धमकावलं जातं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंढरपूर येथील कल्याण काळे यांना दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतल्या सर्व पदांचा राजीनामा दिला, त्या नुकत्याच मला भेटून गेल्या, माझ्या पतीविरोधात केसेस आहेत. त्या सोडवण्याच्या बदल्यात मला पक्षांतर करावं लागतं आहे असं त्यांनी मला सांगितल्याचंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कायद्याचं राज्य आहे की नाही अशी शंका वाटावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. फोडाफोडीसाठी सत्तेचा गैरवापर सुरु असून कर्नाटक सरकारही अशाच पद्धतीने पाडण्यात आल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही विनाकारण तुरुंगात टाकण्यात आलं. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी पक्षांतराला नकार दिल्यानेच त्यांच्या घरांवर छापे मारण्यात आले. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा पूर्णपणे गैरवापर केला जातो आहे, असाही आरोप शरद पवार यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केला.

कर्नाटकनंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे असेही पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. पण त्याच सदनामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील बैठका घेतात. त्या वास्तूचे त्यांनी देखील कौतुक केले. तसेच त्या कामासाठी राज्य सरकारचा एक ही रुपया गेलेला नाही.महाराष्ट्र सदनाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार राजकीय आकसातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री दुष्काळाकडे कानाडोळा करून प्रचाराकडे लक्ष देत आहेत यावर बोलताना ते म्हणाले, पक्षाचा प्रचार करणे यात काही गैर नाही पण दुष्काळाबाबत जेवढी खबरदारी घ्यायला हवी होती तेवढी घेण्यात आलेली नाही.