केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. आता राजकीय नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जनतेला स्वप्नं दाखवणारा नेता चांगला वाटतो. पण हीच स्वप्नं पूर्ण केली नाही तर जनता मारायला अंगावरही येते, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी म्हणाले, स्वप्नं दाखवणारा नेता लोकांना चांगला वाटतो. पण दाखवलेले स्वप्नं पूर्ण केली नाहीत तर लोक त्यांना मारतातही. त्यामुळे स्वप्नं तीच दाखवा जी पूर्ण होऊ शकतात. मी स्वप्नं दाखवणाऱ्यांपैकी नाही. मला कोणताच पत्रकार विचारू शकत नाही. मी जे बोलतो, ते १०० टक्के पूर्ण करतो. गडकरी जेव्हा हे बोलत होते, तेव्हा उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली.

काही दिवसांपूर्वीही गडकरी यांनी आपल्या वक्तव्यातून भाजपाने २०१४ मध्ये जाणूनबुजून खोटी आश्वासने दिल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले होते. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सत्तेवर येणार नाही याचा आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. ..आता जेव्हा आम्ही सत्तेत आलो आहोत. तर लोक दिलेल्या आश्वासनांची आम्हाला आठवण करून देत आहेत. सध्या आम्ही फक्त स्मितहास्य देतो आणि पुढे जातो, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाल्यानंतर त्यांनी यावर खुलासाही दिला होता.