दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर पिकांच्या पाहणीस आलेले केंद्राचे पथक पावणेतीन तास जिल्ह्य़ात होते. त्यातील पावणेदोन तास प्रवासात, तर एक तास प्रत्यक्ष पीकपाहणीचा होता.
गेवराईत पाहणी करून सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी शिवारात आगमन झालेल्या पथकाने २० मिनिटे कापूस पिकाची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्पावर पथक पोहोचले. येथे तासभर अप्पर दुधना प्रकल्पाची पाहणी केल्यावर पथक बदनापूरला रवाना झाले. बदनापूरजवळील पिकांची १० मिनिटे पाहणी केल्यावर दुपारी साडेबारा वाजता पथक जालना तालुक्यातील गोंदेगाव फाटय़ावर पोहोचले. तेथे दहा मिनिटे कापूस पिकाची पाहणी करून पाऊणच्या सुमारास पथक वाघ्रूळ शिवारात पोहोचले. तेथे दहा मिनिटे पाहणीनंतर एक वाजता पथक विदर्भाकडे रवाना झाले. औरंगाबादकडून विदर्भात जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या आसपासचा परिसर पथकाच्या पाहणीसाठी निवडला होता. केंद्रीय पथकाचा घाईघाईत झालेला हा दौरा म्हणजे शासकीय पातळीवर औपचारिकतेचा म्हणजेच खानापूर्तीचाच भाग असल्याचे जाणवले.
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर साहूकर, पाणीपुरवठा व जलनिस:स्सारण मंडळाचे सहायक सल्लागार विजयकुमार बाथल, कापूस पणन संचालनालयाचे संचालक आर. पी. सिंग, अन्न महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सुधीरकुमार, कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण संचालक के. व्ही. देशमुख आदींचा पथकात समावेश होता. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घाडगे, जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार आदी अधिकारी दौऱ्यात उपस्थित होते.
सटाणा, निमगावच्या शेतक ऱ्यांशी पथकातील अधिकाऱ्यांचा संवाद
प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विभागातील दुष्काळसदृश स्थितीच्या पाहणीस दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने सोमवारी सटाणा, निमगाव या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सटाणा गावातील पाहणीदरम्यान पथकाने शेतक ऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांबाबत, पाणीटंचाईबाबत समस्या जाणून घेतल्या. या वेळी शेतक ऱ्यांनी सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, या बाबत पथकाला माहिती दिली. गावातील शेतकरी विठ्ठलराव घावटे यांच्या शेतातील तूर पिकाच्या नुकसानीची, कोरडया विहिरीची पथकाने पाहणी केली. या वेळी शेतक ऱ्यांनी पाणीटंचाईमुळेच तूर पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणले. पाणीटंचाई, वीजप्रश्न, खताला अनुदान, पीकविमा योजनेचा लाभ आदी विषयांबाबत शेतक ऱ्यांनी पथकाचे लक्ष वेधले. याच भागातील शेतकरी कैलास रिठे यांच्या शेतातील बाजरी पिकाच्या नुकसानीची पाहणीही पथकाने केली. पथकातील अधिकाऱ्यांनी गावातील अन्य शेतक ऱ्यांशीही संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शेतकरी कुटुंबाचे सांत्वन
पठण तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानदेव तुकाराम सुरासे या शेतक ऱ्याने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. पाचोडपासून ५-६ किलोमीटर आत असलेल्या निमगाव येथील शेतकरी सुरासे यांच्यावर ३८ हजार रुपये शेतीचे कर्ज होते. अधिकाऱ्यांनी सुरासे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुरासे यांना ५ एकर शेती असून, यात कापूसपीक घेतले आहे. त्यांना ११ व १४ वर्षांची मुले आहेत. याच गावातील अशोक पंडित या शेतक ऱ्याची पाण्याअभावी जळालेली ५ एकर मोसंबीबाग पथकाने पाहिली. पथकातील अधिकारी प्रवेश शर्मा, डी. एम. रायपुरे, वंदना सिंघल यांच्यासह विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, फलोत्पादन संचालक सुदाम अडसूळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहायक सल्लागार विजयकुमार बाथला, कापूस संचालनालयाचे संचालक आर. पी. सिंग, उपायुक्त चंद्रशेखर साहुकार, भारतीय खाद्य निगमचे विभागीय महाव्यवस्थापक सुधीर कुमार, कृषी विभागाचे संचालक के. बी. देशमुख, सहसंचालक जनार्दन जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, उपविभागीय कृषी अधिकारी धमेंद्र कुलथे, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, महसूल व कृषी विभागांचे अधिकारी आदी या पाहणी दौऱ्यात सहभागी होते.