मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने पाहणीचे सोपस्कार पूर्ण करणे सुरू केले असून, सोमवारी रात्री लातूर तालुक्यातील बोरगाव काळे शिवारातील शेतकऱ्याच्या तुरीची पाहणी ९ मिनिटांत उरकली व पथक लातूर मुक्कामी आले. मंगळवारी सकाळी रेणापूर तालुक्यातील पळशी व बावची या दोन गावांना पथकाची नियोजित भेट होती. मात्र, पळशी टाळून बावची येथील रस्त्यालगतच्या शेतात पाहणी करून पथक अंबाजोगाईकडे रवाना झाले.
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे या पथकासोबत होते. त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना परिसरातील पाणीटंचाई व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची माहिती दिली. पिकांची पसेवारी ५०पेक्षा कमी आहे, हे यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरच केंद्र सरकारची राज्य सरकारला मदत दिली जाते, हा प्रघात असल्यामुळे केंद्राचे पथक मराठवाडय़ाच्या पाहणीच्या दौऱ्यावर आहे. पथकातील सदस्यांची घाई लक्षात घेता प्रश्न विचारण्याच्या अगोदरच वर्गातील हुशार विद्यार्थी उत्तर देतो त्याप्रमाणे पथकातील सदस्य परिस्थितीवर भाष्य करीत होते.