कोल्हापुरातील वाढती करोना रुग्णसंख्या आणि मृत्युदर हा राज्यभर चर्चेत असताना केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात करोना परिस्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिला.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज (गुरूवार) आवटे यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे पथक आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रदीर्घ आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सारे काही आटोक्यात असल्याचा सूर लावला.

ते म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आलेख पाहता संसर्ग उशिराने होतो आणि उतरणीचा काळही उशिराचा आहे. ६० वर्षांवरील ७८ टक्के लोकांचे लसीकरण ही समाधानकारक बाब आहे. गेल्या या आठवड्यात बाधित दर (पॉझिटिव्हिटी रेट) १० टक्के पेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये १०० टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्यूचे प्रमाण प्रति शेकडा २.९ टक्के होते; ते या आठवड्यात २.६ याक्के इतके कमी झाले आहे. मृत्युदराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत असले तरी त्याची कारणे शोधण्याचे काम प्रशासन, डॉक्टर करीत आहेत. प्रत्येक मृत्यूचे लेखापरीक्षण केले जात आहे.

जनुकीय संक्रमणाची चिंता नको –

जनुकीय संक्रमणावर बाबत ते म्हणाले, अल्फा, बीटा, डेल्टा असा कोणताही विषाणू असला तरी चिंतेचे कारण नाही. कोल्हापूरसह देशांमध्ये सध्या डेटा विषाणू अधिक दिसत आहे. यावर योग्य उपचार केले जात आहे. विशेष काळजी म्हणून केंद्रीय प्रयोगशाळेकडे राज्यातील शंभर नमुने तपासणीसाठी पाठवून त्यानुसार येणाऱ्या अहवालानुसार उपायोजना केली जात आहे.