दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. केंद्राकडून ४ हजार ७१४. २८ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने एकूण सहा राज्यांना मदत जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्राला ४ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी ही मदत देण्यात आली आहे.

मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी एकूण ७, २१४. ०३ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यात हिमाचल प्रदेशसाठी ३१७. ४४ कोटी, उत्तर प्रदेशसाठी १९१. ७२ कोटी रुपये, आंध्र प्रदेशसाठी ९००. ४० कोटी रुपये, गुजरातसाठी १२७. ६० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ९४९. ४९ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राला ४, ७१४. २८ कोटी रुपयांची आणि पुद्दचेरीसाठी १३. ०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ७ हजार ९५० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त होते. मात्र, केंद्राने यापैकी ४ हजार कोटींचीच मदत जाहीर केली आहे.