केंद्र सरकारने देशातल्या साडेचौदा कोटी ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 10 हजारांचे मानधन सुरु करावे अशी मागणी अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी केली. औरंगाबादमध्ये आस्था फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली. इतकंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. आयुष्याची संध्याकाळ ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता आली पाहिजे आणि त्याचसाठी त्यांना दरमहा 10 हजारांचे मानधन सुरु करा अशीही मागणी बोकील यांनी केली.

आजची तरुण पिढी आई वडिलांच्या औषधांच्या आणि मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पिळून निघते आहे. 60 वर्षांच्या वर वय असलेल्या आणि ज्यांना पेन्शन मिळत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारने 10 हजारांचे मानधन दरमहा दिले तर तरुण पालकांचा खर्च वाचेल ते त्यांच्या मुलांना आणखी चांगले शिक्षण देऊ शकतील. वयाची 60 वर्षे या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे अप्रत्यक्षरित्या कर भरला आहे. त्यामुळे मानधन हा त्यांचा हक्क आहे असेही बोकील यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र उद्यान, फुटपाथ, वेगळी रुग्णालयं सुरु करण्यात यावीत अशीही मागणी बोकील यांनी केली. ज्येष्ठ नागरिक ही सर्वात मोठी व्होट बँक आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे. मात्र त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही किंवा मंत्रीही नाही असंही बोकील यांनी म्हटलं आहे.