सातारा जिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा रुग्णालयामधून आज सोमवारी करोनामुक्त झालेल्या १९ रुग्णांना टाळ्यांच्या गजरात तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत स्वगृही सोडण्यात आले. आत्तापर्यंत कृष्णा रुग्णालयाने योग्य उपचाराने तब्बल १०० रुग्णांना करोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले केले आहे. या पार्श्वभूमीवर करोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा रुग्णालयाने दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे केले.

कराड परिसरासह तालुक्यात करोनाबाधितांची संख्या सतत वाढत जाऊन ती पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्णसंख्या राहिली. अशा परिस्थितीत कृष्णा विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष, डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा रुग्णालयाच्या करोना विशेष प्रभागात करोनाबाधितांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि १८ एप्रिलला कराड तालुक्यातील तांबवे येथील पहिला रुग्ण करोनामुक्त झाला. त्यानंतर कृष्णा रुग्णालयाने यशस्वी उपचाराने करोनामुक्त झालेल्या रुग्णांना, सन्मानपूर्वक स्वगृही सोडण्याची मालिकाच सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये करोनाबद्दलची भीती कमी होण्यास मदत झाली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शंभराव्या करोनामुक्त रुग्णाला कृष्णा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी सिंह म्हणाले, कृष्णा रुग्णालयातून आत्तापर्यंत शंभर रूग्ण करोनामुक्त झाल्याची बाब निश्चित आनंदाची आहे. मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा रुग्णालयाच्या उपचारकर्त्यां पथकाचे विशेष अभिनंदन करतो.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच अन्य रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कमी कालावधीत कृष्णा रुग्णालय व्यवस्थापनाने तयार करण्यात आलेल्या या विशेष मार्गाचे कौतुक केले. याप्रसंगी कृष्णा विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष, डॉ. सुरेश भोसले, कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह रुग्णालयाचा सेवकवर्ग उपस्थित होता.