यावल तालुक्यातील फैजपूरच्या शिव कॉलनीत शुक्रवारी रात्री चड्डी-बनियन घातलेल्या दरोडेखोरांनी एका घरातून दरोडेखोरांनी आठ तोळे सोने व आठ हजारांची रोकड लंपास केल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. काही महिन्यांपूर्वी या टोळीने जिल्ह्य़ात धुमाकूळ घातला होता.
शिव कॉलनीतील रहिवासी रेल्वे कर्मचारी अशोक बिऱ्हाडे यांच्या घरात हा प्रकार घडला. मध्यरात्री चड्डी-बनियन घातलेल्या चार दरोडेखोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बिऱ्हाडे, त्यांची पत्नी, मुलगा यांना जिवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी कपाटाच्या किल्ल्या घेतल्या. कपाटातील सोन्याचे दागिने व आठ हजार रुपये त्यांनी काढून घेतले. घरात आणखी काही सापडते काय याची त्यांनी छाननी केली. दूरध्वनी खंडित करून मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावून दरोडेखोर पसार झाले. काही वेळानंतर बिऱ्हाडे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच नाकाबंदी करण्यात आली व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. गौरी नामक श्वानाने बिऱ्हाडे यांच्या घरापासून पूर्वकडे असलेल्या धाडीनदीच्या पात्राजवळून भुसावळ रस्त्याचा मार्ग दाखविला. या दरोडय़ापूर्वी दरोडेखोरांनी दिगंबर भारंबे यांच्या घरावर पहिला प्रयत्न केला. तो असफल झाल्याने त्यांनी बिऱ्हाडे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.