कोल्हापूर,  इचलकरंजी परिसरात धुमाकूळ घालणा-या गणेश रतन नवले या सोनसाखळी चोरटय़ास गजाआड करण्यात इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला रविवारी यश आले. या प्रकरणी नवले याच्यासह चोरीचे सोने घेणारा सराफ़ सलीम उर्फ युनूस युसूफ़ मुल्ला (दोघे रा. पेठवडगांव) यांना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चार लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.  तर, नवले याचा साथीदार प्रदीप दिलीप बाटुंगे हा फरारी आहे. दोनच दिवसापूर्वी मुल्ला याने स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या विरोधात तक्रार करुन चोरीच्या सोन्याबाबत आपल्याला बळीचा बकरा बनवित असल्याचा कांगावा केला होता. शिवाय इचलकरंजी व वडगाव मधील सराफ़ांनी खोचे यांच्या आततायी वर्तनावर ठपका ठेवत एक दिवस व्यवहार बंद ठेवले होते. मात्र नवले व मुल्ला यांच्यावरील कारवाईमुळे चोरटे व सराफ़ यांच्यातील साटेलोटे उघडकीस आले आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी भागातील रसना कॉर्नर याठिकाणी गस्ती पथक फ़िरत असताना गणेश नवले हा त्याठिकाणी दिसून आला. पोलिसांना पाहताच नवले हा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता इचलकरंजीसह कोल्हापूर, गांधीनगर आदी परिसरात त्याने चो-या केल्याची कबुली दिली. त्याने प्रदीप बाटुंगे याच्या साथीने इचलकरंजीत ३, शाहपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ व गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ अशा पाच जबरी चो-या केल्याचे कबूल केले आहे.
नवले याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदर चोरीचे सोने हे पेठवडगावातील सराफ़ सलीम सोनार उर्फ युनूस युसूफ मुल्ला याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी  सराफ़ालाही अटक केली असून त्याच्याकडून १६ तोळे ४ ग्रॅम सोने व पाव किलो चांदी असा चार लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुल्ला याने चोरीचे सोने घेतल्याबद्दल खोचे यांच्या पथकाने त्याच्याकडे मागील आठवडय़ात चौकशी केली होती. त्या वेळी आपल्याला नाहक त्रास दिला जात असल्याबद्दल मुल्ला याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे नाटक करुन सराफ़ असोसिएशनकडे खोचे यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यावरुन जिल्ह्यातील सराफ़ दुकाने बंद ठेवून संघटनेने गावभाग पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. पण अवघ्या दोन दिवसातच मुल्ला याचे पितळ उघडे पडल्याने त्याचीच चर्चा जोरदारपणे सुरू आहे.