रेल्वेची साखळी ओढून विनाकारण गाडी थांबवण्याचे प्रकार अनेकदा घडतात. पण, आता ते घडू शकणार नाहीत. रेल्वे मंत्रालयाने साखळ्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. साखळ्या ओढल्याने गाडय़ांना विलंब होऊन तीन हजार कोटींचे नुकसान झाले होते. रेल्वेतील साखळ्या काढून टाकण्याचे काम बरेलीच्या इज्जतनगर येथे सुरू झाले आहे. त्यामुळे आता रेल्वेची साखळी ओढून सगळी गाडी थांबवून बाकीच्या प्रवाशांना विलंब करण्याचा हा प्रकार इतिहासजमा होणार आहे.

पर्यायी व्यवस्था दिली जात असून, त्यात चालक व सहायक चालकाचा भ्रमणध्वनी क्रमांक डब्यात लावला जाईल व अडचणीच्या स्थितीत प्रवासी चालकांना दूरध्वनी करू शकतील.

 उत्तर-पूर्व रेल्वेचे इज्जतनगर विभागाचे जनसपंर्क अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले, की आता यापुढे धोक्याच्या साखळ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साखळ्या काढून टाकल्या जात आहेत. नवीन डबे तयार केले जात आहेत. रेल्वे मंडळाने त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, नवीन गाडय़ांतही साखळ्या लावल्या जाणार नाहीत. निगा व दुरुस्तीसाठी येणाऱ्या डब्यांमधील साखळ्या काढून टाकण्यात येत आहेत. चालकांच्या भ्रमणध्वनीशिवाय एक कर्मचारी दर तीन डब्यांमागे एक याप्रमाणे ‘वॉकीटॉकी’ घेऊन उभा असेल. प्रवासी अनेकदा साखळी ओढून विनाकारण रेल्वे थांबवित असत, त्यात आपत्कालीन स्थितीपेक्षा व्यक्तिगत कारणे अधिक होती. लोक आपले नातेवाईक खाली राहिले तरी साखळी ओढत होते.

उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात तर साखळ्या ओढणे ही डोकेदुखी होती. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत होते.