खातेवाटपात आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाले आहे. दालन किंवा निवासाशिवाय लोकांची कामे करता येतात. जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मंत्रालयातून जनतेची कामे होणार नसतील, तर मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून लोकांना न्याय मिळवून देऊ, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. येथील विश्रामगृहात रविवारी पत्रकारांशी ते बोलत होते.

आपण कुठल्याही खात्याची मागणी केली नव्हती. अपंग बांधवांना आणि गरिबांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आपण सामाजिक न्याय विभाग मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. एरव्ही हे खाते कुणीही मागत नाही. आपल्याला जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास यासह ४ ते ५ विभाग मिळाले आहेत. या विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.

विदर्भ-मराठवाडय़ात सिंचनाचे प्रश्न गंभीर आहेत. अनेक ठिकाणी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेलेले नाहीत. काही ठिकाणी सिंचन प्रकल्प पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

चांगल्या अधिकाऱ्यांना आपण खांद्यावर घेऊ, त्यांचा सत्कार करू, पण ते कामचुकार असतील, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. जे अधिकारी दिरंगाई करतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आपले मत आहे. कारवाईच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी कितीही मोर्चे काढू देत. मंत्रिपद गेले तरी बेहत्तर, आपले उत्तरदायित्व हे जनतेसोबत आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. मंत्रालयात सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी असतील, तर आपण मंत्रालयाच्या बाहेर खुर्ची टाकून लोकांना न्याय मिळवून देऊ, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.