एकीकडे राज्यामध्ये सत्तास्थापनेवरुन संघर्ष दिवसोंदिवस अधिक गुंतागुंतीचा होताना दिसत आहे. त्यातच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. कोणाचे सरकार येणार यावरील पडता अद्याप उठलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेमधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टोलेबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेचाही या नाटुकल्यामध्ये वापर करण्यात आला. भाऊ कदम यांनी साकारलेल्या भूमिकेने ठणकावून ‘मी पुन्हा येईन’ असं सांगिलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेचा बालदिन विशेष भाग या आठवड्यात प्रदर्शित झाला. काही कलाकार त्यांच्या मुलांबरोबर या विशेष भागात पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी थुकरटवाडीमधील कलाकारांनी ‘पक् पक् पकाक’ या चित्रपटाचे विडंबन केले. या विडंबनामध्ये भाऊ कदमने चिकलूची भूमिका साकारली होती. एका प्रसंगामध्ये भाऊला शाळेतील गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राजकीय टोलेबाजी करण्यात आली आहे. गुरुजींनी सर्वात मोठा पक्षी कोण असं प्रश्न विचारला असता भाऊ ‘सोपं आहे सर ज्याच्याकडे १४५ सीट असतो तो,’ असं उत्तर देतो. त्यावर गुरुजी भाऊला ‘काय रे ८० मार्काचा इतिहास तुझ्या लक्षात राहत नाही आणि २० मार्कांच नागरिकशास्र बरं लक्षात राहतं?’ असा सवाल करतात. त्यावर ‘सर सध्या २० मार्कांच्या नागरिकशास्रावरच सर्व न्यूज चॅनेल सुरु आहेत,’ असं उत्तर भाऊ देतो. हे उत्तर ऐकल्यानंतर गुरुजी भाऊला वर्गाबाहेर काढतात. त्यावेळेस वर्गातून बाहेर जाताना भाऊ गुरुजींना अगदी आत्मविश्वासने सांगतो की, ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ या अॅक्टचा व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मी पुन्हा येईन…’ ही घोषणा देत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाल्यानंतर अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन तिढा निर्माण झाला. आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यामध्ये स्वत:चा मुख्यमंत्री बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच नेटकरी आता फडणवीस यांना या जुन्या घोषणेवरुन ट्रोल करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu daya bhau kadam comment on current maharashtra political situation scsg
First published on: 15-11-2019 at 16:49 IST