लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांचा पुत्र नीलेश राणे यांचा पराभव करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या माजी आमदार दीपक केसरकर यांच्या पाडावासाठी एक महिन्यापूर्वी शिवबंधनात अडकलेले सुरेश दळवी यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला असला, तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे डावे-उजवे समजले जाणारे राजन तेली, परशुराम उपरकर व दीपक केसरकर यांच्या पाडावासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नारायण राणे यांचे डावे-उजवे समजले जाणारे माजी आमदार राजन तेली आणि उपरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात राहणार आहेत. राजन तेली यांना राष्ट्रवादीने तर उपरकर यांना मनसेने उमेदवारी देऊ केली आहे. सुरेश दळवी यांना राषट्रवादीत प्रवेश देऊन राजन तेली यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
शिवबंधनात अडकलेले माजी आमदार दीपक केसरकर यांची सर्व बाजूंनी राजकीय गोची करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार असल्याने शिवबंधनात अडकलेल्या सुरेश दळवी यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन या निवडणुकीत नारायण राणे यांनी एकाच दगडात दीपक केसरकर, राजन तेली व उपरकर यांना घायाळ केले असल्याचे मानले जाते.
सावंतवाडी मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर गेले काही महिने दीपक केसरकर, राजन तेली व परशुराम उपरकर यांनी फिरून मतदारसंघाचा रागरंग अनुभवला आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी संघटना खिळखिळी बनली आहे, असे बोलले जात आहे.
काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नीलेश राणे यांच्या पाडावासाठी खांद्याला खांदा लावून सुरेश दळवी यांनी प्रयत्न केले. त्यांनाच काँग्रेस पायघडय़ा घालत असल्याबद्दल राजन तेली यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे चारही बाजूंनी ढोल वाजत असताना सुरेश दळवी यांना राष्ट्रवादीने प्रवेश देऊन, नारायण राणे यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला असल्याने राजकारणात भरपूर काळ मैत्री व शत्रुत्व टिकणार नाही, असे वाटत आहे. यामुळे या मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.