’ करोनाकाळात आरोग्य सेवांपुढे किती मोठे आव्हान होते? या वेळी पालिकेने कशा पद्धतीने आरोग्य सेवा वाढविल्या?

नोव्हेबर २०२० मध्ये या पदावर माझी वर्णी लागली. या वेळी शहरात काहीशी रुग्णांची संख्या कमी होत चालली होती, पण संकट टळले नव्हते. शहरात शासकीय मोठी रुग्णालये उभारण्याचे काम सुरू झाले होते. वरुण इंडस्ट्री, कौल सिटी आणि अग्रवाल ही केंद्रे उभी केली होती. पण यात काम करणाऱ्या मनुष्यबळाची कमी होती यामुळे आम्ही सर्व प्रथम मनुष्यबळ वाढविण्याकडे भर दिला. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पालिका रुग्णालये सुविधांनी अद्ययावत केली. शहरातील प्रतिबंधात्मक क्षेत्रे वाढविली. चाचण्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्या. त्याचबरोबर बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे अहवाल ठेवले. विरार येथे म्हाडामध्ये ५००, तर वसईच्या जी. जी. महाविद्यालयात ७०० रुग्णांसाठी अलगीकरण केंद्र तयार केले. तर इतर आजारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचार केंद्र तयार केले.

’ दुसऱ्या लाटेचा सामना करताना काय अडचणी आल्या आणि त्यावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने यंत्रणा तयार केल्या.

डिसेंबर महिन्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसला. याच काळात करोनावरील प्रतिबंधात्मक लससुद्धा यशस्वी ठरली होती. यामुळे आम्हाला काम करण्यासाठी यंत्रणा वाढविण्यासाठी वेळ मिळाला. त्यात शासनाच्या नियमावली सतत बदलत होत्या. यानुसार आम्ही तयारी सुरू  केली. पुन्हा करोना उपचार केंद्र सुरू केले. त्यात नव्याने कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि इतर मनुष्यबळ घेतले. चंदनसार येथे कोविड रुग्णालय सुरू केले. मागील वर्षीच्या अनुभवातून आम्ही तयारी करत होतो. यंत्रणा या वेळी वाढविण्यात आल्या. त्रुटी दूर केल्या, पण दुसऱ्या लाटेची दाहकता प्रचंड असल्याचा अनुभव मार्च महिन्यात आला. मोठय़ा झपाटय़ाने रुग्ण बाधित होऊन गंभीर होत असल्याचे चित्र समोर आले. त्यानुसार अतिदक्षता आणि प्राणवायू खाटांची गरज वाढली. यामुळे आम्ही या वरुण इंडस्ट्री येथे १५० प्राणवायू खाटा वाढविल्या. त्याचबरोबर चंदनसार रुग्णालयात सुद्धा खाटा वाढविल्या.

’ शहरात आणखी करोना केंद्रे तयार करणार आहात का?

हो, रुग्ण वाढत असल्याने आणखी केंद्र वाढवत आहोत. विरारच्या बोळींज येथे १५० खाटांचे आणि नालासोपारा येथे समेळ येथे १५० खाटांचे  रुग्णालय तयार करण्यात करण्यात येत आहे. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांना तात्पुरत्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. जुचंद्र येथे गरोदर महिलांसाठी करोना उपचार केंद्र सुरू केले आहे.

’ लसीकरण करण्यासाठी  कशा पद्धतीची व्यवस्था केली?

जानेवारी महिन्यापासून पालिकेने लसीकरणाला सुरुवात केली. शासनाने दिलेल्या नियमानुसार पालिकेने लसीकरण सुरू केले. सुरुवातीला १०  केंद्रांवर  पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांचे लसीकरण केले. सुरुवातीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद होता, पण पालिकेने जनजागृती करत लसीकरण वाढविले. चौथ्या टप्प्यात शासनाने वयोगट ४५च्या पुढील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेने नऊ लसीकरण केंद्र वाढविले. आणि काही खासगी रुग्णालयांनासुद्धा लसीकरणाची परवानगी दिली. आता शासनाने १८ वर्षांवरील सर्वाना लस देण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेने अग्रवाल वसई येथे भव्य २४ तास लसीकरण केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. आतपर्यंत ९७ हजारांहून नागरिकांचे लसीकरण केले आहे.

 

’  विरारमधील विजय वल्लभ आगीनंतर इतर रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत किंवा काय निर्देश दिले आहेत?

विजय वल्लभ रुग्णालयातील आग दुर्घटना अतिशय दुखत घटना आहे. या घटनेनंतर आम्ही सर्व रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणा अद्ययावत आहेत की, नाही याची पाहणी करत आहोत. त्याचबरोबर यासंबंधित इतर विभागालासुद्धा सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणाचा अभाव आढळून येईल अथवा जी रुग्णालये दिलेल्या वेळेत यंत्रणा अद्यावत करणार नाहीत त्यांवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. सध्या कोविड काळ सुरू असल्याने प्राथमिकता रुग्णांना अधिकाधिक उपचार कसे मिळतील याकडे वैद्यकीय विभाग लक्ष देत आहे.

’ खासगी रुग्णालयातील वाढती देयके, रेमडेसिविर आणि प्राणवायूचा तुटवडा आणि त्यात वाढता काळाबाजार यावर पालिका काय कारवाई करत आहे?

शहरातून वाढीव देयकाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी महापालिकेने लेखापरीक्षण समिती तयार केली आहे. यानुसार रुग्णांनी पालिकेच्या दिलेल्या ईमेल आणि संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवायची आहे. २४ तासांच्या आत समितीतर्फे कारवाई केली जात आहे. रेमडेसिविर आणि प्राणवायू ही अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीसुद्धा पालिका यात जातीने लक्ष घालत आहे. यासाठी पालिकेने प्रभागनिहाय पथके तयार केली आहेत. ती दररोज रुग्णालयांतील रेमडेसिविर आणि प्राणवायूचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवत आहेत. पालिकेने स्वत:चा प्राणवायूसाठी टँकर विकत घेतला आहे. त्याचबरोबर तीन नवे प्राणवायू प्रकल्प महानगरपालिका महिनाभराच्या आत उभारत आहे.

’  सध्या शहरात खाटांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. तसेच घरी अलगीकरणात नागरिकांना उपचार मिळत नाहीत यासाठी पालिका काय करत आहे?

पालिकेने सध्या घरी अलगीकरणात उपचार मोफत केले आहेत. करोना लक्षण जाणवू लागल्यास रुग्णांनी अहवालाची वाट न पाहता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधायचा आहे. यात त्यांना लागणारी सर्व मदत केली जाणार आहे. पालिका त्यांना मोफत एक औषधोपचार संच देत आहे. ज्यामुळे त्यांना लवकर औषधोपचार मिळतील आणि त्यांची प्रकृती गंभीर होणार नाही. तसेच शहरातील खाटांची माहिती मिळविण्यासाठी पालिकेने डॅश बोर्ड  तयार केला आहे. तो ँ३३स्र्://५५ूेूुी.िस्र्ं’ॠँं१.्रल्लऋ  या संकेतस्थळावर आहे. सध्या करोना संकट  हे व्यवस्थेला मोठे आव्हान आहे. यामुळे सर्व समाज घटकांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. सध्या डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. मात्र आम्ही शर्थीचे प्रयत्न करून करोना नियंत्रणात आणून दाखवू.

करोनाचे वाढते संकट वसई-विरार महापालिकेपुढे आव्हान बनले आहे. अपुरी आरोग्य व्यवस्था आणि तुटपुंजे मनुष्यबळ यामध्ये सेवा  देण्यात पालिकेची कसोटी लागत आहे. मात्र या संकटाचा पालिकेचा आरोग्य विभाग शर्थीने मुकाबला करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. याबाबत पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांच्याशी केलेली बातचीत.

(मुलाखत : प्रसेनजीत इंगळे)