|| विश्वास पवार

अवघ्या १२ दिवसांत २५ हजार करोना रुग्ण

वाई : सातारा जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचा वेग ३७ ते ४० टक्क्यांच्या आसपास आहे. गेल्या बारा दिवसांत २५ हजारहून अधिक रुग्ण वाढले आहेत. तर २३ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाचा मृत्युदरही मोठा आहे. प्रशासनाने पहिल्या आठ दिवसांच्या टाळेबंदी व संचारबंदीनंतर आणखी आठ दिवसांनी १५ मेपर्यंत वाढ केली आहे.

सातारा जिल्ह्यातील परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी कुटुंबेच्या कुटुंबे करोनाबाधित होताना आढळून येत आहेत. त्यामुळे शासकीय करोना काळजी केंद्राशिवाय अनेक खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. जागा कमी पडू लागल्याने साताऱ्यात जम्बो कोविड केंद्र उभारण्यात आले आहे.

तरीही जिल्ह्यात रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. रुग्णांवर उपचारांसाठी नातेवाईकांची धावाधाव सुरूच आहे. रुग्णालयात जागा उपलब्ध होत नसल्याने रुग्णवाहिकेमध्ये उपचार केले जात आहेत. रुग्णाला जागा मिळाली तर प्राणवायूची आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे.

एकूणच शहरांप्रमाणे गावोगावी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील खासदार- आमदारांनी आपापल्या मतदारसंघांत करोना काळजी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र विलगीकरण कक्षाची कमतरता असल्याने उपचारानंतर घरी सोडलेले, करोनाबाधित परंतु लक्षणे आढळून न येणारे रुग्ण गृह विलगीकरणात राहिल्याने व घरे छोटी असल्याने कुटुंबातील काही सदस्य नव्याने बाधित होत आहेत.

नागरिकांचे दुर्लक्ष

काही जण गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरून प्रसार वाढवत आहेत. यात्रा-जत्रांना बंदी घातली असली तरी स्थानिक कार्यक्रम, लग्न समारंभ, बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे करोना रुग्णवाढ सुरूच आहे. अनेक गावांनी गावबंदी करूनही ग्रामीण भागातील रुग्ण जास्त आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना गावाबाहेरील शाळा, हायस्कूल, मंदिरे, समाजमंदिरात ठेवले जात आहेत.

साताऱ्यात सहा लाख पाच हजार ३८८ लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी एक लाख २५ हजार ४७२ बाधित आढळून आले. त्यापैकी एक लाख ९२ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना काळजी केंद्रात तेवीस हजार रुग्ण उपचार घेत आहेत. २९१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सातारा, कराड, फलटण, वाई, कोरेगाव, खटाव, जावली या तालुक्यांत रुग्णसंख्या वाढते आहे. येथील मृत्युदरही जास्त आहे. करोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्युदर कसा रोखायचा याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

साताऱ्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यात लसीकरणासाठी नागरिक पुन्हा मोठ्या संख्येने बाहेर आहेत.

सध्या करोना रुग्णांवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत. प्रशिक्षित मनुष्यबळाचा मोठा तुटवडा आहे. त्यामध्ये मनुष्यबळ उपलब्ध व्हायला हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. करोना रुग्णांसाठी रुग्णालये उभारता येतील व खाटाही वाढवता येतील. पण कुशल मनुष्यबळाअभावी हे अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळामध्ये तपासणी, कोविड उपचार, सर्वसामान्य उपचार आणि लसीकरण यासाठी मनुष्यबळ वापरावे लागत आहे. काही कर्मचारी व त्यांचे नातेवाईक करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे हाच उपाय आहे. – डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा.