मधुकर पिचड व बाळासाहेब थोरात हे दोघे माजी मंत्री सत्तेत असताना जिल्हय़ातील पाणी खाली जायकवाडीला सोडण्याची भूमिका घेत होते, तेच आज त्याला विरोध करत आहेत. या दोघांना भूमिका बदलण्याचा साक्षात्कार कसा झाला, जिल्हय़ावर अन्याय झाला तेव्हा का झाला नाही, याची उत्तरे दोन्ही माजी मंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिले. निळवंडे धरणाचे कालवेही या दोघांनीच जाणीवपूर्वक होऊ दिले नाहीत आणि खापर आमच्या माथी फोडले, असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला.
येथील सरकारी विश्रामगृहावर विखे पत्रकारांशी बोलत होते. निळवंडे धरण व कालवे वेळेत पूर्ण झाले नाहीत, त्याला त्यांनी विरोध केला. जाणीवपूर्वक माथी भडकवण्याचे काम केले. धरणासाठी कालबद्ध कार्यक्रम हवा होता. त्याचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा होता, हे आमच्या सरकारचे अपयशच आहे, असेही विखे म्हणाले.
दुष्काळग्रस्तांना सरकार दिलासा देऊ शकत नसल्याने स्थलांतर वाढू लागले आहे. सरकार केवळ घोषणा करत असल्याने लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे कर्जमाफी करा, वीजबिल माफ करा, शैक्षणिक शुल्क माफ करा, छावण्या सुरू करा, दुधाला ३५ रुपये भाव द्या, आदी मागण्यांचे ठराव ग्रामसभेत करावेत, यासाठी काँग्रेसने मोहीम सुरू केल्याची माहिती विखे यांनी दिली.
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयावरून आश्वासने देणारे केंद्रात सत्तेवर आल्यावर मात्र केवळ बिहारला पॅकेज देऊन महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहेत. ‘चाय पे चर्चा’ हा सर्व ढोंगीपणा आहे. केंद्रीय पथक तीन वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, परंतु मदत काही मिळाली नाही. लोकांनी तुमच्या हातात सत्ता दिली, मात्र तरीही मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच आहेत. याचा अर्थ सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव दिसतो, अशीही टीका विखे यांनी केली.
‘त्यावर’ बोलणार नाही!
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर विखे म्हणाले, राज्य सहकारी बँक व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांची चौकशी सुरू असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र या चौकशीला ‘त्यांनीच’ उत्तरे द्यायची आहेत. गेल्या दहा वर्षांत ७३ हजार कोटी खर्च करून केवळ ०.१ टक्का सिंचन झाल्याच्या कृषी खात्याच्या अहवालावर मतभेद असल्याचेही त्यांनी आता स्पष्ट केले. राष्ट्रवादीने उद्या, बुधवारी जेलभरो आंदोलन आयोजित केले आहे, याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी प्रत्येक पक्षाला आंदोलनाचा अधिकार आहे, असे उत्तर दिले.
कर्डिले यांचे सूचक वक्तव्य
सरकारी विश्रामगृहावरून विरोधी पक्षनेते विखे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले एकाच मोटारीतून एकत्र राहुरीकडे रवाना झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपानंतर विखे भाजपच्या वाटेवर असल्याचा पलटवार करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर राधाकृष्ण विखे व शिवाजी कर्डिले यांचे एकत्र येणे याचा परस्पर संबंध लावला जात आहे. ‘त्यांना फार प्रश्न विचारू नका, थोडे दिवस राहिलेत, मुहूर्त शोधणे सुरू आहे’ असे सूचक वक्तव्य कर्डिले यांनी पत्रकारांकडे पाहून केले.