निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात शासकीय व खासगी मालमत्तेचे  मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. दोन जणांना प्राण गमवावे लागले. वीजेचे हजारो खांब पडल्यामुळे  रायगड जिल्ह्यात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दूरसंचार यंत्रणा कोलमडली आहे. वीजपुरवठा व संपर्क यंत्रणा पूर्ववत करणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. यासाठी राज्य सरकारकडून  जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त कर्मचारी मागवावे लागणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रायगड जिल्ह्याला बसला. यात श्रीवर्धन, मुरूड, रोहा, माणगाव, म्हसळा, तळा, अलिबाग, पेण, पाली या तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. घरांची छप्परे उडाली.  कच्ची घरे कोसळली. आंबा, काजू, सुपारी बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात उमटे येथे वीजेचा खांब पडून एक जणाचा तर श्रीवर्धन तालुक्यात भिंत  अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. या वादळाचा फटका  वीज मंडळाला जास्त बसला आहे. वीजेचे हजारो खांब पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. हे खांब उभे करणे, तसेच संपर्क सेवा सुरू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.

वीजपुरवठा सुरू करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. जिल्ह्यातील मनुष्यबळ अपुरे पडणार असून राज्य शासनाकडून  दुसऱ्या जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवावे लागणार आहे.

..त्यामुळे जीवित हानी टळली

निसर्ग  चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात  येणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली होती. कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या  १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर होणारी जीवित हानी टाळली. रायगड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला.

कोकणाला वेगळे पॅकेज द्या

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात तसेचे रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. करोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावत विशेष पॅकेज द्यावे , अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न नुकसानीचा आढाव घेतला. आमदार प्रशांत ठाकूर,  आमदार रमेश पाटील, दक्षिण रायगड जिल्हा  भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, परशुराम म्हात्रे त्यांच्या समवेत होते.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करून शेतकाऱ्यांपर्यंत मत पोहोचवा, असे आदेश विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिले.

‘वीजपुरवठा सुरू करण, दळण वळण तसेच संपर्क सेवा सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येईल. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तीन दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.’

– आदिती तटकरे, पालक मंत्री रायगड