नीलेश पवार

टाळेबंदीनंतर पहिले २५ दिवस एकही करोना रुग्ण न आढळलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ात अवघ्या पाच दिवसांत सात रुग्ण आढळल्याने अस्वस्थता पसरली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी असताना रुग्णांनी परराज्यात अथवा मालेगावसारख्या शहरातून नंदुरबारकडे सहजपणे कसा प्रवास केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक रुग्ण प्रवासाचा इतिहास आणि संपर्कात आलेल्यांची नीट माहिती देत नसल्याने प्रशासनासमोर विषाणू फैलाव रोखण्याचे आव्हान आहे.

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर अतिदुर्गम भागात वसलेला नंदुरबार हा आदिवासी जिल्हा. रोजगारासाठी हजारो लोकांना दरवर्षी गुजरातसह महाराष्ट्रातील इतर भागात स्थलांतर करावे लागते. टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ हजारहून अधिक जणांनी घरचा रस्ता धरला. प्रारंभी स्थलांतरितांचा आकडा धोक्याची घंटा वाटत होता, मात्र त्यातील एकातही करोनाची लक्षणे आढळून आली नसल्याने प्रशासनाने सुटकेच्या नि:श्वास टाकला होता. टाळेबंदीतील पहिल्या २१ दिवसांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतरही नंदुरबारमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता. टाळेबंदीच्या २५व्या दिवशी पहिला रुग्ण आढळल्याने जिल्ह्य़ात खळबळ उडाली. या रुग्णाच्या प्रवासाच्या इतिहासाबाबत बराच गोंधळ होता. प्रारंभी हा रुग्ण मालेगावहून परतल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. पोलिसांनी त्याच्या ‘सीडीआर’ अहवालाची छाननी केल्यानंतर तो मालेगाव नव्हे तर गुजरातमध्ये आपल्या नातलगाच्या उपचारासाठी गेल्याने बाधित झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आणखीन तीन कुटुंबीयांना विषाणू लागण झाल्याचे आढळले. त्यामुळे लोकांची चिंता वाढली.

नंदुरबार शहरापुरता मर्यादित असणारा करोना विषाणू शहाद्यासह अक्कलकुवासारख्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला. अक्कलकुव्यातील जो रुग्ण बाधित आढळला, त्याने तर या कठोर संचारबंदीत सहा दिवसांपूर्वी मालेगावमधून अक्कलकुवापर्यंत प्रवास केल्याचे सांगितले जाते. राज्य आणि जिल्ह्य़ाच्या सीमांवर खडा पहारा असताना मालेगाववरून थेट अक्कलकुव्यापर्यंत त्याने प्रवास तरी कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नंदुरबारमध्ये आरोग्य सुविधा तोकडय़ा आहेत. दररोज भाजीपाला आणि किराण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी वारंवार विनंती करूनही त्यांना गांभीर्य वाटत नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे शहरी भागातील लोकांनीही आता करोनाचा धोका ओळखून प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.

..तर संसर्ग झाला कसा?

शहादा शहरात आढळलेले दोन रुग्ण आपण कुठेही बाहेर गेलो नसल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे त्यांना घरबसल्या करोनाचा प्रादुर्भाव कसा झाला, हा प्रश्न आहे. मुळातच करोनाबाधित रुग्णांकडून त्यांचा प्रवासाचा इतिहास, संपर्कात आलेल्यांची माहिती हवी तशी मिळत नसल्याने त्यांचा भ्रमणध्वनी इतिहास तपासण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. यातून अडचणी निर्माण होत आहेत. काही रुग्ण सहकार्य करीत नसल्याने गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमांवर पोहोचलेल्या करोनाला रोखण्यात यश आलेल्या नंदुरबारमध्ये अवघ्या काही दिवसांत सात रुग्ण आढळले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाची धांदल उडाली आहे.