डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लँचेटचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. या पाश्र्वभूमीवर परमसंगणक निर्मितीचे जनक विजय भटकर यांनी प्लँचेटमार्फत खुनाचा तपास शक्य आहे, असे समर्थन करणारे वक्तव्य केल्याचे जाहीर झाले. पण हे खरे असल्यास भटकरांनी प्लँचेटकडून आत्मा बोलावण्याचे व त्यामार्फत खुनाचा तपास लावणे शक्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती दिले.
अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात आपली भूमिका स्पष्ट केली. सचिव बाधव बावगे, सुशीला मुंडे, मििलद देशमुख, उपाध्यक्ष प्रा. अनिरुद्ध जाधव, प्रकाश घादगिने, रामकुमार रायवाडीकर आदींच्या या पत्रकावर सह्य़ा आहेत. दाभोलकरांनी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खर्ची घातला. त्यात बुवाबाजी, आत्मा, पुनर्जन्म, भूतबाधा, भानामती, प्लँचेट यासारख्या दाव्यांना शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे समाजाची दिशाभूल होते व कुटुंबाचे शोषण होते, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दाभोलकरांच्या खुन्याच्या तपासासाठी त्यांचाच आत्मा बोलावून प्लँचेट करणाऱ्यांची मदत घेण्यात आली, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. अशा प्रकाराला जबाबदार घटकांची चौकशी करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका अंनिसने घेतली असताना प्लँचेटमुळे खुनाचा तपास शक्य आहे, असे वक्तव्य भटकरांनी केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात मान्यता मिळविलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे समर्थन समाजाची दिशाभूल करणारे व वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रतारणा करणारे ठरते. त्यामुळे भटकरांनी प्लँचेट प्रकाराने खुनाचा तपास करणे शक्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान अंनिसने दिले आहे. कुठल्याही चमत्कारसदृश व अितद्रिय शक्तीचा दावा करण्यास असलेले २१ लाखांचे इनाम प्लँचेटमार्फत तपासाच्या सिद्धतेसाठी देण्यास तयार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.