जून महिन्यात संपूर्ण कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पण जुलैमध्ये संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ये यांनी दिली.

भुत्ये म्हणाल्या, पुढील चोवीस तासात ठाणे, पालघर आणि मुंबई या ठिकाणी काही भागांमध्ये मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथे काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत म्हणजेच ३ आणि ४ जुलैपासून पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.