मुंबई : सोमवारपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.

जुलैच्या पहिल्या आठवडय़ात किनारपट्टीसह राज्यभरात मान्सून सक्रीय होणे, दक्षिण गुजरातमधील चक्रवाती वर्तुळाकार स्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीदेखील झाली. त्यानंतर गेल्या तीन दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले होते.

सोमवारपासून पुन्हा मान्सून सक्रीय होत असून दक्षिण कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तसेच अंतर्गत भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या दिर्घकालिन विस्तारीत पूर्वानुमानानुसार १६ जुलैपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतरच्या दोन आठवडय़ात मराठवाडय़ात काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी होईल मात्र इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.

शनिवारी दिवसभरात राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. रविवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, सोमवारी संपूर्ण किनारपट्टीवर आणि कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडू शकतो.