मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात मध्यम पावसाची शक्यता

पुणे : पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने कोकण किनारपट्टीलगतच्या भागासह विदर्भात अनेक ठिकाणी १० ते १३ ऑगस्ट या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ११ ऑगस्टपासून तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, रविवारी (९ ऑगस्ट) विदर्भात अनेक भागांत पावसाची हजेरी होती.

ऑगस्टच्या सुरुवातीलाच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे कोकणासह कोल्हापूर भागामध्ये सध्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. मुंबई, ठाण्यातही पावसाने धुमाकूळ घातला. चार दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर ओसरला असला, तरी सध्या पुन्हा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रामुख्याने मध्य भारतात आणि उत्तर-पश्चिम भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रातही सध्या मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. या दोन्ही स्थितीमुळे राज्यातील काही भागांत पुन्हा हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, सोमवारपासून त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १० ते १३ ऑगस्टदरम्यान कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचे प्रमाण अधिक असेल. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील प्रामुख्याने घाटक्षेत्रात पाऊस पडणार आहे.

उद्यापासून तीन दिवस मुंबई, ठाण्यात मुसळधार?

११ ऑगस्टपासून तीन दिवस मुंबई, ठाण्यातही मुसळधारांचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्य़ांतही जोरदार सरींची शक्यता आहे.