काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकीत नवीन उमेदवारांची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे सामान्य व दलित कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळणार आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत पक्षाच्या विजयाला हातभार लावावा, असे आवाहन पक्षाच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. राजू यांनी केले.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष धोंडीराम वाघमारे होते. शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, युवकचे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले, महिला जिल्हाध्यक्ष सविता मोरे आदी उपस्थित होते.
पक्षाने आता कार्यकर्त्यांसाठी बदल घडवण्याचे धोरण स्वीकारले आहे, त्यानुसार पक्षाच्या सर्व संघटनांचे नेते अपापल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्यात व जिल्ह्य़ात दौरे करत आहेत, असे सांगून राजू म्हणाले, त्यानुसार होत असलेल्या या बैठकीतील कार्यकर्त्यांच्या तक्रारी व भावना मी श्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार आहे. यापुढे नेत्यांनी कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा, असे धोरण राहुल गांधी यांनी घेतले आहे. त्यादृष्टीने पक्ष आता पावले टाकत आहे. प्रत्येक राज्यात दलित नेते व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे प्रयत्न जिल्हा व ग्रामीण भागात पोहोचवले जाणार आहे.
दलित नेते व कार्यकर्त्यांना सन्मान न मिळणे व त्यांना पुढे येण्यासाठी ताकद न मिळण्याची मुख्य तक्रार आहे. त्याची दखल पक्षाने घेतली आहे. त्यामुळेच सामान्य व दलितांना उमेदवारीची संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे, असेही राजू यांनी स्पष्ट केले. विभागाचे जिल्हाध्यक्ष रामभाई पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक निखिल वारे, सरचिटणीस उबेद शेख, रुपसिंग कदम, राजेश बाठिया, संतोष भडकवाड, मच्छिंद्र यादव, परशुराम साळवे, मजाबापू साळवे आदी उपस्थित होते.