हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने कुंभमेळ्यात देशभरातील साधू-महंतांशी मंथन करण्याचे नियोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. त्यासाठी सिंहस्थ नगरीत खास संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रात व राज्यात भाजप सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या कुंभमेळ्यात हिंदू धर्म प्रसाराची नव्याने मुहूर्तमेढ रोवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
‘विहिंप’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर देशात ठिकठिकाणी हिंदू संमेलनासह विविध उपक्रम होतील. या सुवर्ण जयंती वर्षांची सांगता सिंहस्थात ६ सप्टेंबर रोजी संत संमेलनात होईल. जनार्दन स्वामी आश्रमात हे संमेलन होईल. धर्मातर केलेल्या हिंदूंना परत धर्मात प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संघटना ‘घरवापसी अभियान’ला अखिल भारतीय आखाडा परिषदेने पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर, सिंहस्थात काही आखाडय़ांनी हे अभियान राबविण्याचे संकेत दिले आहेत. अल्पसंख्याक व्यक्ती व कुटुंबे हिंदू धर्माकडे आकर्षित होत असल्याचा दावा करत त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने ‘जातकर्म व नामकर्म’च्या विधीद्वारे धर्मातर घडवून आणण्याची योजना आखली आहे.