जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या बेपर्वाईमुळे सुमारे ५ टीएमसी पाणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निळवंडेतून सोडलेले पाणी अन्यत्र वळविल्याने तसेच योग्य नियोजन न केल्याने ते जायकवाडीला पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे.
निळवंडे धरणातून गुरुवार दि. २८ ला जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. १ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडले जात असून, १० दिवसांत १३१ किलोमीटरचा प्रवास झाला आहे. आत्तापर्यंत पाणी भेर्डापूर येथेच पोहोचले असून अजून ७० किलोमीटरचा टप्पा बाकी आहे. आतापर्यंत धरणातून १ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले असून पावणे ४ टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. कासवगतीने पाण्याचा प्रवास सुरू राहिला तर पाणी जायकवाडीपर्यंत जाण्यास किमान आणखी १० दिवसांपेक्षा अधीक कालावधी लागेल. जायकवाडीला एक ते दोन टीएमसी पाणी पोहोचते की नाही याबद्दल शंकाच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत मराठवाडय़ात लाभ मिळावा म्हणून तटकरे यांनी दि. २८ला अचानक पाणी सोडण्याचा तोंडी आदेश दिला. मात्र मुळा, भंडारदरा, दारणा व गंगापूर धरणांतून पाणी सोडण्यास न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविला. या आदेशामुळे तटकरे यांचा हेतू सफल होण्याची शक्यता मावळली आहे.
निळवंडे धरणातून सध्या १ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. त्यापैकी डाव्या कालव्याला ४२८ क्युसेक्स तर उजव्या कालव्याला १७६ क्युसेक्स पाणी गावतळी व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सोडले आहे. प्रवरा नदीपात्रातून अवघे एक हजार क्युसेक्स एवढे पाणी जाते. निळवंडेतून अधिक क्षमतेने पाणी काढता येत नाही. जायकवाडीला वेगाने पाणी जाण्याकरिता भंडारदऱ्यातून पाणी सोडावे लागते. पण आता न्यायालयाच्या स्थगितीमुळे ते शक्य नाही. कासवगतीने निघालेल्या पाण्याची मोठी तूट येत आहे. हे पाणी सोडले नसते तर लाभक्षेत्रातील शेतीचे नियोजन योग्यप्रकारे झाले असते. पण तटकरे यांचा अट्टहास नडला. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तटकरे यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली नाही. तटकरे यांची त्यामुळे आता गोची झाली आहे. पाणी जायकवाडीलाही गेले नाही अन् शेतीलाही मिळाले नाही.