गेल्या आठवड्याभरात नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या सरासरी घाऊक किंमतीत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाल्याने येणा-या दिवसात कांदा सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याची शक्यता आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारपेठेत होणा-या लिलावाचा प्रभाव देशभरातील कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ दरांवर दिसून येतो. लासलगावमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या लिलावांच्या वेळी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १६५० इतका दर मिळाला होता. मात्र, आठवड्याभरात म्हणजे शुक्रवारी झालेल्या लिलावाच्या वेळी प्रतिक्विंटल मागे कांद्यासाठीचा सरासरी दर १९७५ रुपयांवर जाऊन पोहचला. यावेळी बाजारपेठेत ८५०० क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. त्यामुळे येणा-या काळात राज्यातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेमध्ये याचा परिणाम पाहायला मिळेल.
पावसाने दडी  मारल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शेतकरी चांगली किंमत मिळण्याच्या आशेने कांदा उत्पादन बाजारात आणत नाही आहेत. मागणी आणि पुरवठा यांच्यातील या अंतरामुळे सरासरी घाऊक कांद्याच्या किमती वाढ झाल्याचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब  पाटील यांनी सांगितले.