सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला वेसण घालून शहराचा विकास साधणारे आणि अवघ्या सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर ग्रामविकास खात्यामध्ये बदली करण्यात आली आहे. मंत्रालयातून बदलीचा निरोप आला असल्याचे गुडेवार यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
गुडेवार हे सोलापूर महापालिकेत गेल्या वर्षी ४ जुलै २०१३ रोजी रुजू झाले होते. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीला एक वर्षही पूर्ण होत नाही तोच, केवळ अकरा महिन्यांत महापालिकेतील राजकीय हितसंबंध दुखावलेल्या सत्ताधारी मंडळींनी गुडेवार यांना माघारी पाठविण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून अखेर गुडेवार यांच्या बदलीचा घाट घातला गेल्याचे उघडपणे बोलले जात होते. गुडेवार यांनी वर्षांच्या आत आपली बदली होणार, हे गृहीत धरून महापालिकेतील कारभार चांगलाच गतिमान करून तीन वर्षांतील कामे अवघ्या एका वर्षांत करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी दोन-तीन वेळा त्यांच्या बदलीसाठी सत्ताधाऱ्यांनी कट कारस्थान रचले होते. त्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न झाला. गेल्या महिन्यात पाणीप्रश्नाची ढाल पुढे करून सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत त्यांचा अवमान केला होता. त्यामुळे वैतागून गुडेवार यांनी थेट बदलीचा अर्ज शासनाकडे पाठवून निघून जाणे पसंत केले असता त्या वेळी अवघे सोलापूरकर गुडेवार यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते.