मोदी लाटेच्या सुनामीत औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या नितीन पाटील यांच्यावर १ लाख ६१ हजार ५६३ मतांची भक्कम आघाडी घेत घवघवीत यश मिळविले. खैरे यांनी सलग चौथ्यांदा हा विजय साजरा केला.
निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे आणि मिळालेले भरघोस मतदान याची सांगड घालता घालता शिवसैनिक हैराण झाले होते. नेत्यांनाही आश्चर्य लपवता आले नाही. आम आदमी पक्षाचे सुभाष लोमटे यांना ११ हजार ९६५ मते मिळाली. बसप उमेदवाराला ३७ हजार ३८७ मते मिळाली, जी आम आदमी पार्टीपेक्षाही अधिक आहेत. मात्र, मोदी लाटेत कोणीही टिकाव धरू शकले नाही. खैरे यांना ५ लाख १९ हजार ९९९, तर पाटील यांना ३ लाख ५८ हजार ४३६ मते मिळाली. ६ हजार ३६३ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.
कन्नड, गंगापूर, वैजापूर विधानसभा मतदारसंघांत खैरे यांना निर्णायक आघाडी मिळाली. जातीचा मुद्दा पुढे करून काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला प्रचारही कामी आला नाही. मोदी एके मोदी अशाच स्वरुपाचे मतदान सर्वत्र दिसून आले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मात्र मंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्वत:ची आब राखली. या मतदारसंघात खैरे यांना आघाडी घेता आली नाही. खैरे व दर्डाचे राजकीय मेतकुट असते, असा आरोप नेहमी केला जात असे. या मतदारसंघात खैरेंना आघाडी घेता न आल्याने दर्डा समर्थक खूश होते. मतमोजणीच्या ठिकाणी आमदार सुभाष झांबड वगळता काँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही. काँग्रेसचे उमेदवार पाटील मतमोजणी केंद्रातदेखील आले नाहीत.
मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघात खैरे यांना १००ही मते मिळाली नव्हती. पाटील यांना ७ हजारांहून अधिक मते मिळाली. दहाव्या फेरीपर्यंत असाच कल होता. त्यानंतर औरंगाबाद पूर्वमधील मतदान खैरे यांच्याकडे झुकत गेले. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मतदानाची आघाडी कमी होती. मात्र, १९व्या फेरीत खैरे यांची आघाडी १ लाख ४० हजारांपर्यंत गेली. मतमोजणीचा वेग अधिक होता. मात्र, निकाल जाहीर करण्यास कमालीचा विलंब लावला गेला. शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांनाही एवढा मोठा विजय मिळेल, याची कल्पना नव्हती. दुपारनंतर निकाल हाती आल्यानंतर चौकाचौकांत जल्लोष करण्यात आला. रात्री उशिरा मिरवणुकीला सुरुवात झाली.
मतमोजणी केंद्रापासून उघडय़ा जीपवर निघालेली मिरवणूक क्रांती चौकमार्गे संस्थान गणपती येथे विसर्जित करण्यात आली. चौकाचौकांत कार्यकर्ते स्वागतास थांबले होते.
औरंगाबादचे रस्ते आता चकाचक – खैरे
दीड लाखाहून अधिक मतांच्या फरकाने झालेला हा विजय विकासासाठी महत्त्वाचा आहे. एवढे दिवस विरोधी पक्षात असताना विविध विकासकामे केली. आता तर हक्काचे सरकार असल्याने औरंगाबादचे रस्ते चकाचक होतील आणि विकासही मार्गी लागेल, असे खैरे यांनी विजयानंतर सांगितले.