महायुतीतील घटक पक्षांना १८ जागा : पाटील

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेतही भाजप व शिवसेनेची युती कायम राहणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ जागांवर लढणार आहे. तर, महायुतीतील घटक पक्षांना उर्वरित म्हणजे १८ जागा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

औरंगाबाद विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठय़ा भावावरून कायमच कुरघोडी सुरू असते. जागा वाटपातून लहान भाऊ व मोठा भाऊ, हे ठरवले जाते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपचे अधिक खासदार निवडून आले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत शिवसेना मोठा भाऊ असेल, असे वृत्त पसरवले जाते. त्या पाश्र्वभूमीवर आगामी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत विचारले असता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व भाजप दोघेही समसमान जागांचे सूत्र ठरवेल, तर महायुतीतील घटक पक्षांना १८ जागा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

खैरेंचा पराभव माजी सेना आमदाराकडून

माजी खासदार चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पारंपरिक मतदारांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी दौरे करीत आहेत. या दौऱ्यांमध्ये ते आपल्या पराभवास भाजपचे पदाधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी, खैरे यांचा पराभव शिवसेनेच्या माजी आमदाराने केला आहे, भाजप पदाधिकाऱ्यांमुळे त्यांचा पराभव झाला नाही, असे उत्तर दिले.