महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती होणार हे निश्चित आहे. जागा वाटपावर विविध पातळयांवर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेद्वारे लोकांचे आभार मानत असून गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या नेतृत्त्वात शिवसेना नेत्यांशी चर्चा करून जागा वाटपावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार क्लबच्या वतीने आज शनिवारी आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपची सदस्य नोंदणी जोरात सुरू आहे. सरकारच्या योजना लोकापर्यंत पोहोचवल्या आहेत. विरोधकांनी ईव्हीएममुळे भाजप विजयी झाल्याचे कितीही आरोप केले, तरी त्यात तथ्य नाही. ईव्हीएम वगळून बॅलेट पेपरवरही निवडणूक घेतली तरी आज भाजपच जिंकेल.

इतर पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्यांना थेट विधानसभेचे तिकिट मिळत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे का, असा विचारला असता पाटील म्हणाले, भाजपमध्ये असे निवडक उमेदवार आहेत. पण, आमदार, मंत्री आणि विविध महामंडळातील पदाधिकारी सदस्यांमध्ये भाजपचे ९५ टक्के कार्यकर्तेच आहेत. एखाद्याला तिकिट दिले की शर्यतीत असणाऱ्या इतरांमध्ये नाराजीचा सूर असेलच. पण, नाराजी संपवून पक्षासाठी काम करायची गरज असते.  विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेना युती एकत्र लढेल. विद्यमान आमदारांच्या जागा कुणीही मागणार नाही. उर्वरित जागांपैकी किती जागा कुणी लढवायच्या व कोणत्या जागा कोणाच्या वाटय़ाला येतील, यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी  दिली.  मागास प्रवर्गाना मुख्य प्रवाहाशी जोडण्याकरिता आरक्षण लागू करण्यात आले होते. त्या बाबीचा आढावा घेणे आवश्यक आहे. आढावा घेणे म्हणजे आरक्षण रद्द करणे नव्हे, असे सांगून  पाटील यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मताचे समर्थन केले.

रामराजेंशी भाजप प्रवेशाबाबत चर्चा

विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याची कबुली पाटील यांनी दिली. तसेच उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास आनंदच होईल. पण, अद्यापही त्यांचा पक्षबदलण्याचा निर्णय झालेला नाही. त्याशिवाय इतर तीन ते चार आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ईडीच्या कारवाईसाठी दोन वर्षांपासून तयारी!

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार केल्याने त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे, असा आरोप भाजपवर होत आहे. हा आरोप सपशेल खोटा असून ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआयकडून कोणावरही कारवाई करण्यापूर्वी त्या व्यक्तीची संपत्तीपासून सर्व खासगी स्वरुपाची माहिती अतिशय गुप्तपणे गोळा केली जाते. याकरिता साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लागतो, असेही पाटील म्हणाले.

न्यायालयाच्या आदेशानुसारच पवारांवर कारवाई

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळयात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. विरोधकांची गळचेपी करण्यासाठी हे राजकीय डावपेच नाहीत. सिंचन घोटाळयाचेही प्रकरण नागपूर खंडपीठात सुरू असून त्यात न्यायालयाकडून येणाऱ्या आदेशांची सरकार पूर्तता करीत आहे. योग्य आदेश मिळाल्यानंतर सिंचन घोटाळयातही पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सुतोवाच पाटील यांनी केले.