कानाखाली मारण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात मोठा राजकीय वाद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा थोबाडीत मारणे या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यामधील आघाडी सरकारसंदर्भात बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केलीय.

भरचौकात उद्धव ठाकरेंनी आपल्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही, असं महाविकास आघाडी सरकारच्या म्हणजेच ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या एका नेत्याने म्हटल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसोबत बोलताना केलाय. आम्हाला अनपेक्षितपणे सत्ता मिळाली असल्याने आम्हाला प्रत्यक्षात थोबाडीत मारली तरी शांत राहू, असं या नेत्याने म्हटल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. अगदी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू शकत नाही असंही मंत्रीमंडळातील एका बड्या नेत्याने आपल्याशी बोलताना म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांनी थेट कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दिशेने असल्याचं स्पष्ट होतं आहे.

याचसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना त्यांना अफवा पसरवण्याची सवय असल्याचा टोला लगावलाय. “ते एक मंत्री कोण? असं हवेत गोळीबार करुन चालत नाही. कोणीकोणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजपाचे इतर नेते असतील ते अशाप्रकारच्या अफवा पसरवून त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा. पण मी वारंवार सांगतोय हे सरकार अजून तीन वर्षे उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतरही महाविकास आघाडी सत्तेवर येईल, त्याबद्दल निश्चिंत राहा,” असं राऊत म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिलीय. या वक्तव्याबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, “हे बोलणं म्हणजे गंमत करणं आहे. चंद्रकांत पाटील अलीकडे फार गंमती करतात,” असं म्हणत या वक्तव्याकडे फारसं गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे संकेत दिलेत.

मागील महिन्यामध्येच आपल्या जन-आशिर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर एका भाषणाचा संदर्भ देत केलेल्या टीकेमध्ये थेट कानाखाली मारण्याची भाषा केलेली. यानंतर नारायण राणेंना अटक करुन त्यांची जामीनावर सुटका करण्यात आलेली. या प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजपा समर्थकांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये संघर्ष झाल्याचं पहायला मिळालेलं.