राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत आहे. गत आर्थिक वर्षांत मुद्रांक शुल्कातून अपेक्षित उत्पन्नापेक्षा ५ हजार ४९५ कोटींचे अधिकची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली. या वाढीव उत्पादनातून येत्या पावसाळी अधिवेशनात नगरपरिषदांना निधी देणे शक्य होईल असा विश्वास देताना, कराडमधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीस राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, राजेंद्र यादव  उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, कराड शहराला गेल्या साडेतीन वर्षांत २२ कोटींचा निधी दिला आहे. आता पुन्हा विविध विकासकामांसाठी ६० कोटींची मागणी करण्यात आली आहे. सत्तेपेक्षा जनतेला केंद्रबिंदू मानत शासन कार्यरत असल्याने कराडच्या विकासाला लागेलएवढा निधी देऊ अशीही ग्वाही त्यांनी दिली. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या पक्षाची अथवा विचाराची सत्ता आहे का, हे न पाहता भाजप सरकार लोकांकडे पाहून विकासकामे करते, निधी देताना तुम्ही आमच्या उमेदवारांनाही सहकार्य करा, असे आता बोलण्याची गरज नाही, पण आगामी निवडणुकीत विकासाच्या आधारेच लोक कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे तर, कराड दक्षिणेत डॉ.अतुल भोसले यांना साथ करतील असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. जयवंत पाटील म्हणाले, कराड पालिकेस गेल्या सरकारकडून केवळ १३ कोटींचा निधी मिळाला. तर, गेल्या केवळ दीड वर्षांत चंद्रकांतदादांच्या  माध्यमातून २२ कोटींचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. कराडची वाढ झपाटय़ाने होत आहे. हद्दवाढीमुळे नव्याने समाविष्ट भागातील विकासकामांसाठी निधीची गरज आहे. राजेंद्र यादव यांनी पर्यावरणपूरक सोलर सिटी, शहराची पूररेषा नव्याने करणे, शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीही भरीव निधीची मागणी केली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विकास कामांचा आराखडा चित्रफितीद्वारे सादर केला. वैशिष्टय़पूर्ण योजनेतील कामे, घनकचरा व्यवस्थापन, पाणी योजना, स्वच्छता, पार्किंग यासाठी निधीची आवश्यकता पटवून दिली. पालिकेच्या इमारतीवर सौर ऊर्जा किट बसवण्यासाठी १९ कोटी, शासकीय विश्रामगृहाजवळ जिव्हेश्वर मंदिर ते पाटण कॉलनीपर्यंत नवीन उड्डाणपुलासाठी २.५० कोटी, विठ्ठल चौक, भाजी मंडईतील पार्किंगसाठी कोटी, बालाजी सभागृहासाठी १.९० कोटी, वाढीव भागातील रस्त्यांसाठी १५ कोटी, कृष्णा नाका जनकल्याण शाळा रस्त्यासाठी ५ कोटी, शिवाजी स्टेडियम दुरुस्ती व विस्तारासाठी १० कोटी आदी कामांचा शासनाकडे करण्यात आलेल्या निधीच्या प्रस्तावात समावेश आहे. यावेळी मंत्री पाटील यांनी कराड नगरपालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांशी संवाद साधला.