चंद्रकांत पाटील यांची कोपरखळी

सांगली : पराभवाची कारणे सांगणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे पोचलेले नेते तर काँग्रेसचे आ. विश्वजित कदम हे निरागस असल्याची कोपरखळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना मारली.

बंडखोरीमुळे आघाडीचा पराभव झाला असल्याचे विश्लेषण आ. पाटील यांनी केले आहे, याबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, की ईव्हीएमबाबत साशंकता व्यक्त करीत असले तरी आघाडीचे ३५ कसे निवडून आले? चौकशी करायचीच झाली तर या ३५ सदस्यांच्या विजयाचीही चौकशी करायला हवी. निवडणुकीतील पराभवाला बंडखोरी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष आ. पाटील काढतात, तर आघाडीतील काँग्रेसचे नेतृत्व करणारे आ. कदम हे पराभव धक्कादायक असल्याचे मान्य करीत विचार करायला लावणारा पराभव असल्याचे सांगतात. म्हणजे ते निरागस आहेत तर, जयंत पाटील हे खूप पोचलेले नेते आहेत असेच म्हटले पाहिजे.

भाजपाने जर ईव्हीएममध्ये घोटाळा करून विजय संपादन केला असेल, तर आघाडीचे ३५ सदस्य निवडून येऊच शकले नसते. भाजपाच्या विजयाबाबत जशी साशंकता व्यक्त केली जाऊ शकते तशीच साशंकता आघाडीच्या विजयाबाबत व्यक्त व्हायला हवी.