चंद्रकांत पाटील यांची उपरोधिक टीका

सांगली महापालिकेत दारुण पराभव झाल्यानंतरही विरोधकांनी अद्याप मतदान यंत्र (ईव्हीएम) घोळाचा आरोप कसा केला नाही, याचे आश्चर्य वाटते, अशी उपरोधिक टीका शनिवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बठकीत केली. दरम्यान राजकारणात कार्यकर्त्यांचे पक्षबदल हे होतच असतात, पण त्यांच्या या बदलाला मतदार मान्यता देतात का हे महत्त्वाचे असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यापूर्वी महापालिकेत शून्य सदस्यसंख्या असलेल्या भाजपने थेट सत्ता काबीज केली. या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या या विजयाचे शिल्पकार चंद्रकांत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, की सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आमच्या पारदर्शी व प्रामाणिक धोरणांना मिळालेला कौल आहे. पदरात पराजय पडला म्हणून आता विरोधक काहीही आरोप करतील. पण हे आरोप करणाऱ्यांचा पूर्वइतिहास आणि चारित्र्य थोडे तपासले, तरी त्यातील फोलपणा लक्षात येईल. भाजपने पशाचा आणि बळाचा वापर केला, असा आरोप करणाऱ्यांनी अजून मतदान यंत्रांमधील घोटाळ्याचा आरोप कसा केला नाही, याचे आश्चर्य वाटते. भाजपवाल्यांकडे पसे आहेत आणि आमच्याकडे पसे नसून झोळ्या आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी करणे म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अगोदरच आत्मविश्वास गमावला होता. स्वबळावर लढण्याबद्दल त्यांना शंका वाटत होती. म्हणूनच त्यांनी आघाडी केली. आत्मविश्वास गमावलेल्यांना विजय मिळणे शक्यच नव्हते. सत्तेत असणाऱ्या काँग्रेसबद्दल लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. दुसरीकडे आम्ही आ. सुधीर गाडगीळ यांच्यासारखा स्वच्छ चेहरा नेतृत्व म्हणून दिला. त्यामुळे लोकांनी भाजपच्या पारडय़ात मते टाकली.

भाजपा मुस्लीमविरोधी, दलितविरोधी म्हणून आमच्यावर शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात आम्ही सर्वाधिक मुस्लीम व दलित उमेदवार दिले आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून आमची ओळख निर्माण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांना घेऊन भाजपने निवडणूक लढविल्याचा आरोप विरोधकांनी केला मात्र, हा कोणत्याही क्षेत्रात चांगल्या माणसांना खेचण्याचा प्रयत्न होत असतो. भाजपने अशाच चांगल्या लोकांना खेचले आहे. तसेच या बदलाला मतदार मान्यता देतात का हेही महत्त्वाचे असते, आमच्याबाबत लोकांनी त्याला मान्यता दिली, असेही ते म्हणाले.

हा पेढा लोकसभेसाठी!

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नेत्यांनी आणलेल्या पेढय़ांमधील एक पेढा उचलून चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांना भरविला. आगामी लोकसभेसाठी हा पेढा असल्याचे सांगून त्यांनी उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेची जबाबदारीही त्यांच्याकडे राहील, असेही सांगितले.