सांगली महापालिकेची निवडणूक जिंकल्याने भाजपला आता केरळ, तामिळनाडूची निवडणूक सोपी वाटत असून सांगली, कोल्हापूर सर केल्याने पुढचे लक्ष्य सातारा असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र ही कोणाची मक्तेदारी नसून यापुढे जयंत पाटील हे माजी नेते म्हणून ओळखले जातील असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार यांचा वाढदिवस आणि महापालिकेतील भाजपचा विजयोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. त्या वेळी इनामदार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, महापौर संगीता खोत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, दिलीप सूर्यवंशी, दीपक शिंदे, सुरेश आवटी, गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, की सांगली, कोल्हापूरचे विषय संपले आहेत. पुढील आठवडय़ात साताऱ्यातही लक्ष घालणार आहोत. यापुढे तीनही फक्त भाजपच असेल. पश्चिम महाराष्ट्रावर कोणाची मक्तेदारी नसून यापुढे जयंत पाटील आता आजी नव्हे माजी नेते म्हणून ओळखले जातील.

महापालिकेत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकला. आगामी लोकसभा निवडणुकीचे संयोजक म्हणूनही इनामदार यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. खासदार संजय पाटील यांना ते देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणतील. तसेच सांगली जिल्ह्य़ातील आठही विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार आमचेच असतील. या वेळी राज्यमंत्री खोत, खा. पाटील, आ. गाडगीळ आदींची भाषणे झाली.