News Flash

तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही अन् तुम्ही…; चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. (संग्रहित छायाचित्र)

कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं काढलेल्या आदेशावर टीका केली होती. ही टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीनं संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्यावर “आम्ही तुमचे बाप आहोत,” अशी टीका केल्यानंतर पाटील यांनी हे विधान केल्यानं राष्ट्रवादीनं थेट नरेंद्र मोदींचा नामोल्लेख टाळत पाटलांचा बाप काढला आहे.

अजित पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी “आम्ही तुमचे बाप आहोत”, असं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून थांबत नाही, तोच पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पाटील यांनी बारामती कृषी उत्पन्न समितीनं काढलेल्या आदेशावर भाष्य करताना अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांवर टीका केली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले, त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपाची? कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्यासाठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे,” अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

तीन कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंडपासून चौफुल्यापर्यंत एका ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत भाषण करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी या विधेयकाला विरोध होत आहे. भाजप या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल. राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 4:13 pm

Web Title: chandrakant patil shashikant shinde bjp ncp sharad pawar narendar modi bmh 90
Next Stories
1 …त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे; भाजपाची मागणी
2 “पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी…,” अमृता फडणवीसांविरोधात शिवसेना आक्रमक
3 …मग पोलिसांची खाती ॲक्सिस बँकेमध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा?; मिटकरींचा भाजपावर निशाणा
Just Now!
X