News Flash

हे सरकार सत्तेवर आणल्याचा पवारांना पश्चात्ताप होतोय; चंद्रकांत पाटलांचा सवाल

"राज्यपालांवर कुत्सित टीका करणे जाणत्या राजाला शोभत नाही"

“घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठवले. असा दृष्टिकोन जाणत्या राजाला शोभत नाही”, असा टोला लगावत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “असं सरकार सत्तेवर आणल्याचा पश्चाताप होतोय का?,” असा सवालही उपस्थित केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रकाशित केलेल्या ‘कॉफी टेबल’ पुस्तकावर शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यपालांनी पाठविलेल्या कार्य अहवालावर शरद पवार यांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हा अहवाल पाहिला, तर त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या २८ नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३० डिसेंबरच्या शपथविधीची छायाचित्रे आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे असे सरकार सत्तेवर आणल्याचाच पश्चात्ताप होतोय, हे त्यांनी सांगितले पाहिजे. पण त्यासाठी त्यांनी राज्यपालांच्या अहवालाचा आधार घेऊ नये,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

“संपूर्ण अहवालात अनेक मान्यवरांसोबतच्या भेटींची छायाचित्रे आहेत, पण आपले छायाचित्र मान्यवर नेत्यांप्रमाणे दिसत नाही, हे जाणवल्यामुळे व्यथित होऊन शरद पवार यांनी असे पत्र लिहिले का, असा प्रश्न पडतो. शरद पवार ज्यांना अन्य छायाचित्रांमधील एखाद दुसरा प्रसंग म्हणतात त्यामध्ये राज्यपालांनी रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणे, पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणे, नंदूरबार जिल्ह्यात आदिवासींसोबत नृत्याचा ठेका धरणे, जालना येथे पन्नास हजार विद्यार्थ्यांसाठीच्या माध्यान्ह भोजन प्रकल्पाचे लोकार्पण करणे, अशी अनेक छायाचित्रे आहेत. अशी अन्य छायाचित्रे शरद पवार यांना दिसली नाहीत, हे आश्चर्य आहे. जनराज्यपाल या वार्षिक कार्य अहवालात ग्राम संपर्क हा वेगळा विभाग आहे. या अहवालात राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांचा फोटोसह राजभवन परिवार म्हणून आस्थेने उल्लेख केलेला आहे. हे सर्व शरद पवार यांना दिसले नाही, हे सुद्धा विशेष आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं उघडण्याबद्दल लिहलेलं पत्र हे ऑक्टोबर महिन्यातील आहे व हा वार्षिक अहवाल सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आहे. या कालावधीचेही जाणत्या राजाला भान राहिले नाही आणि ते अहवालात पत्र शोधत राहिले, हे आश्चर्यकारक आहे,” असं म्हणत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 6:25 pm

Web Title: chandrakant patil slam to sharad pawar over governor letter bmh 90
Next Stories
1 राज्यातील लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवला
2 मंत्रिमंडळ बैठक : दिवाळीआधीच माजी सैनिकांना ठाकरे सरकारचं गिफ्ट
3 कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची बाधा
Just Now!
X