News Flash

“महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज, कारण…”; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

१ ऑगस्टला अधिकाऱ्यांना दूध भेट देऊन करणार आंदोलन

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाचं संकटाबरोबर इतर अनेक प्रश्न डोके वर काढताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरकार पाडापाडीच्या चर्चेही जोरात सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी झडताना दिसून येत आहे. याच मुद्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावताना झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. कारण सरकार आता पडेल की नंतर, या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही,” असा टोला पाटील यांनी लगावला.

१ ऑगस्टला अधिकाऱ्यांना दूध भेट देऊन करणार आंदोलन

“मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिन्यांपासून आयोगाचे ऑफिस बंद आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हे कार्यालय बंद असणे चुकीचे आहे,” असं सांगतानाच पाटील म्हणाले, “दूध दरवाढीसाठी भाजपा १ ऑगस्टला आंदोलन करणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आमचं आंदोलन हिसंक नसेल. अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली, तर देवाला दूध अर्पण करणे, असं आंदोलनाचं स्वरूप असेल,” अशी माहिती पाटील यांनी दिली.

राजू शेट्टींवरही केली होती टीका 

काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरावरून चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. “राज्यात दुधाला सध्या २२ रुपये इतका दर मिळत आहे. २२ रुपये इतक्या साध्या रकमेतून मुलभूत खर्चही भागवणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही. दुधासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी आता अगदी शांत आहे. दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याचं तुम्ही एकदा म्हटलं होतं. मात्र आता त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य ऐकायला मिळत नाही. राजू शेट्टी, कधी आंदोलन करणार आहेत. हे आम्हाला पाहायचं आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 4:27 pm

Web Title: chandrakant patil slam to shivsena ncp and congress bmh 90
Next Stories
1 औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १० हजार ५३८ वर, १३४ नवे रुग्ण वाढले
2 धक्कादायक : करोनाबाधित असलेल्या भोंदू डॉक्टराकडून घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार
3 राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठन करा : चंद्रकांत पाटील
Just Now!
X