महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूरमधील कार्यक्रमामध्ये आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र आज पाटील यांनी या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. मी कुठलाही राजकीय संन्यास घेणार नसल्याचे सांगत मी ते विधान वेगळ्या अर्थाने केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आजचा यू-टर्न

निवडणूक लढवणार नाही हे मी कोल्हापुरमधील डॉल्बीसंदर्भातील भूमिका मांडताना घेतला. मागील वर्षी कोल्हापूरमध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. काल शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी डॉल्बी बंदीमुळे काही मंडळे नाराज झाली असल्याचे मत मांडले. त्यावर नाराजी व्यक्त करताना मी डॉब्ली बंदीमागे माझा कोणताही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू नसल्याचे सांगितले. कारण मला कोणतीही निवडणूक लढवायची नाहीय असं म्हटलं. समाजासाठी चांगली भूमिका घेताना त्या भूमिकेसाठी मतदार माझ्याविरोधात गेले किंवा निवडणुकींमध्ये उभं राहण्यास अडचण आली तरी हरकत नाही असं मला सुचित करायचं होतं असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. समाजाच्या हितासाठी निर्णय घेताना निवडणुकांची भिती ठेवायची नसते. मागील वर्षी डॉल्बीमुक्त उत्सव साजरा केला तो समाजहितासाठीच. समाजहिताच्या गोष्टींमध्ये राजकारण करायचं नसतं. म्हणूनच डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय निवडणुकांच्या तोंडावर मुद्दाम घेतोय अशी कोणतीही गोष्ट नाहीय. सध्या कोणतीच निवडणूक नाहीय म्हणून मी ना लोकसभा लढवतोय, ना विधानसभा, ना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एवढ्यात लढवणार आहे. म्हणूनच मी यापुढे निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.

काल काय म्हणाले

कोल्हापूर पोलीस दलातर्फे दिला जाणाऱ्या गणराया अ‍ॅवॉर्डचे वितरण तसेच जिल्ह्यतील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य व शासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त समन्वय बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील केशवराव भोसले नाटय़गृहातील कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात स्पिकरची भिंत लावण्याच्या मुद्दय़ावरून क्षीरसागर यांनी मांडलेल्या भूमिकेवरून क्षीरसागर आणि पाटील यांच्यात मतभेद झाला. ध्वनियंत्रणेच्या मुद्दय़ावरून क्षीरसागर यांनी गणेश मंडळाच्या अपेक्षांना साद घालणारी भूमिका मांडली. ते म्हणाले, न्यायालयाच्या अधीन राहून स्पिकरची भिंत लावण्यास परवानगी दिली जावी. गणेश मंडळाचे कार्यकर्ते आवाज मर्यादेचे पालन करतील असे सांगत स्पिकरची भिंत लावण्याचे एका अर्थाने समर्थन केल्याने मंत्री पाटील यांनी वेगळाच पवित्रा घेतला. आमदार क्षीरसागर यांनी खुशाल निवडणूक लढवावी, असे नमूद करून महसूलमंत्री पाटील यांनी यापुढे लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदारसंघ अशी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे घोषित केले. गणेशोत्सव काळात स्पिकरची भिंत लावली जाऊ नये, अशी भूमिका घेण्यामागे माझा कसलाही राजकीय हेतू नाही. अशा बाबतीत पैशाचा अपव्यय करण्यापेक्षा गणेश मंडळांनी भागातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

महत्वाचे नेते

२००४ पासून सक्रीय राजकारणामध्ये असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे अनेक महत्वाची खाती आहेत. राज्यात भाजप सकरार आल्यापासून ते कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच ते सहकार, वस्त्रोद्योग, विपणन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख होते. मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडे महसूल, मदत आणि पुर्नवसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.